शिक्षणामुळेच देश घडत असतो. ज्या देशाला शिक्षण नाही त्या देशाला भविष्य नाही, असे सांगून आपल्याला जागतिक कसोटीवर उतरणारी विद्यापीठे तयार करायची आहेत, असे उद्गार आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ पद्मभूषण रघुनाथ माशेलकर यांनी काढले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणेच्या येथील द्रविड हायस्कूलच्या शताब्दी महोत्सव समारंभात डॉ. माशेलकर बोलत होते. कार्यक्रमाला पद्मश्री लीला पूनावाला उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अजित पटवर्धन होते.
डॉ. माशेलकर म्हणाले, शिक्षणातही आता आमूलाग्र बदल होत आहेत. शहरात एक आणि ग्रामीण भागात वेगळे असे शिक्षण असणार नाही. सर्वत्र मूल्यवर्धित शिक्षणपद्धती असेल. शिक्षण म्हणजेच भविष्य आहे. शिक्षकाला आता स्वत:च शिकावे लागणार आहे. कारण आता खडू-फळा जाऊन इंटरनेट शिक्षण येत आहे. शिक्षकाने मुलांना काहीही शिकविले तर मुले इंटरनेटच्या माध्यमातून त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहेत. त्यामुळे शिक्षकांना त्यापुढचे ज्ञान मिळवावे लागणार आहे.
जगातल्या सर्वोत्कृष्ट ६०० विद्यापीठांमध्ये आपले एकही विद्यापीठ नाही याची ही बाब शासनाने चांगलीच मनावर घेतली आहे. त्यामुळे जगातली चांगल्यात चांगली विद्यापीठे आम्हाला यापुढे तयार करायची आहेत. त्यासाठी मूल्याधिष्ठित शिक्षणाला यापुढे महत्त्व येईल. शाळांतून यापुढे देशप्रेम शिकविले पाहिजे. देशप्रेमाविषयी सध्या चिंताजनक परिस्थिती आहे.
जगाची कितीही प्रगती झाली तरी आपली परंपरा व मूल्ये विसरता येणार नाहीत. आपल्याला सुपर कॉम्प्युटर द्यायला नकार देणारी अमेरिका आज आपण प्रत्येक शास्त्रज्ञाला परम सुपर कॉम्प्युटर पुरवतो ते बघून आश्चर्य व्यक्त करते. मराठीत शिकल्यामुळे काहीही फरक पडत नाही. कितीही गरीब शाळेत शिकले म्हणूनही काही फरक पडत नाही. तेथील शिक्षक मात्र श्रीमंत विचाराचे असले पाहिजेत, असेही   डॉ. माशेलकर यांनी सांगितले.
पद्मश्री लीला पूनावाला म्हणाल्या, मोठय़ा शहरांप्रमाणे छोटय़ा छोटय़ा गावांतून व शहरांतूनही शिक्षणाने मोठी प्रगती केली आहे हे पाहून मनाला फारच हायसे वाटले. या भागातही मोठय़ा शैक्षणिक संस्था कार्य करतात हे पाहून बरे वाटले.
डेक्कन एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष अजित पटवर्धन यांनी अध्यक्षीय भाषण केले. श्रीकृष्ण कानिटकर यांचेही भाषण झाले. शालेय समितीचे अध्यक्ष संजय गोखले यांनी आभार मानले. कार्यक्रमाला अनेक माजी विद्यार्थी सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते.