क्षत्रिय कुलंवत सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय.. जय भवानी जय शिवाजी.. जीजाऊ माता की जय अशा घोषणा आणि तुतारीच्या निनादात छत्रपती शिवाजी महाराजांचा नेत्रदीपक आणि विस्मरणीय राज्यभिषेक सोहळा शेकडो शिवभक्ताच्या उपस्थित उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
शिवाजी महाराज राजे झाले तो दिवस होता ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके ११५६. आज या ऐतिहासिक स्फूर्तीदायी घटनेला ३३९ वर्ष झाली आहेत. या मंगलमयी घटनेचे स्मरण करण्यासाठी शिवराज्यभिषेक सोहळा समितीसह विविध सामाजिक संघटनाच्या सहकार्याने महालातील गांधी गेट जवळील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला होता. गांधीगेटजवळील परिसर यावेळी भगवामय करण्यात आला होता. गोविंद पडेगावकर यांच्या पौराहित्याखाली अखंड मंत्रोच्चारात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला १५१ लिटर पंचामृताने अभिषेक करण्यात आला.
भगवे फेटे परिधान करून आबालवृद्धांनी हा सोहळा याचि डोळा अनुभवला. अभिषेक झाल्यानंतर विजयराव देशमुख आणि मुधोजी राजेभोसले यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वस्त्रालंकार व हार घालून अभिवादन केले. यावेळी उपस्थित शिवभक्तांनी छत्रपतींच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या ‘जय देव जय जय देव जय जय शिवराय’ या आरतीने सोहोळ्याची सांगता झाली.
आरती झाल्यावर चिमासाहेब भोसले व्यायाम शाळेच्या विद्यार्थ्यांनी संभाजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली चित्तथरारक शिवकालीन प्रात्याक्षिके सादर केली. डॉ. संभाजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली विक्रम भोसले, जिनित भिमटे, मानसी भोगले, विवेक बारड, आसावरी वैद्य, शुभम शुक्ला, रिता निंबाळकर, अथर्व भोसले,. पृथ्वी राऊत, मंगेश करोले यांनी ढाल व तलवार,भाला फेक, दांडपट्टा, बाणा, भऱ्हाटी, ढाल तलवार, लकडी का हात, दांडपट्टा, भकाटी ग्रुप, जलती भन्नाटी, लाठी हमनच्या प्रात्यक्षिकांनी शिवभक्तांना थेट छत्रपतींच्या काळात नेले.
यावेळी शिवकथाकार सदगुरुदास विजयराव देशमुख, वारकरी संप्रदायाचे ज्ञानेश्वर महाराज वाघ, श्रीमंत राजे मुधोजी भोसले, महापालिकेचे सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, नगरसेविका सारिका नांदूरकर, प्रभा जगनाडे, राजेश घोडपागे, बंडू राऊत, गिरीश व्यास, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वसंतराव बारड, श्रीकांत आगलावे, मुन्ना महाजन, प्रमोद पेंडके, समितीचे संयोजक दत्ता शिर्के, अतुल गुरू, प्रसन्न बाराहाते, श्रीकांत देहाडराय, शेखर कुकडे, श्याम तांबोळी, संजय बाराहाते, विजय कै थे यांच्यासह परिसरातील नागरिक व शिवभक्त मोठय़ा संख्येने उपस्थित होते.