कल्याण-डोंबिवली महापालिकेस ‘ड’ वर्गातून ‘क’ वर्गात बढती मिळाल्यानंतर आता बदलापूर नगरपालिकेला ‘अ’ दर्जाचे वेध लागले आहेत. १४ एप्रिल १९९२ रोजी कल्याण-डोंबिवली महापालिकेतून अंबरनाथप्रमाणेच विभक्त झालेल्या कुळगांव- बदलापूरला ‘ब’ दर्जाची पालिका स्थापन करण्यात आली. त्यावेळी शहराची लोकसंख्या लाखाच्या आत होती. २०११ च्या जनगणनेनुसार पालिकेची लोकसंख्या पावणेदोन लाख होती. मुंबई-ठाण्याच्या तुलनेत किफायतशीर दरात घर उपलब्ध असल्याने बदलापूरमध्ये नव्याने उभारल्या जात असलेल्या संकुलांमध्ये झपाटय़ाने लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत शहराच्या लोकसंख्येत एक लाख रुपयांची भर पडून ती तीन लाखांच्या घरात गेली आहे. पालिका सदस्यांनी तसा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करून शासनाकडे पाठविला आहे. ‘ब’ दर्जामुळे उपलब्ध पालिका कर्मचारी शहरातील वाढत्या लोकसंख्येस नागरी सुविधा पुरविण्यास अपुरे पडत आहेत. त्यामुळे येत्या एप्रिलमध्ये येऊ घातलेल्या पालिका निवडणुकीआधी पालिकेला ‘अ’ दर्जा देण्यात यावा, अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष राजन घोरपडे यांनी दिला आहे.