बालनिर्णय द्या ना.!

लहान मुले चित्रकलेच्या माध्यमातून स्वत:ला छान व्यक्त करतात.

Untitled-1लहान मुले चित्रकलेच्या माध्यमातून स्वत:ला छान व्यक्त करतात. या कलेचे हे सामथ्र्य ओळखून मुलांच्या सर्जनशीलतेला, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा म्हणून प्रयोगशील शाळा जागरूकपणे प्रयत्न करीत असतात. नववर्षांचे स्वागत करताना, प्रत्येक घरात जसे आवर्जून दिनदर्शिका (कॅलेंडर) आणले जाते तसे काही शाळांमध्ये ते आवर्जून तयार केले जाते. शाळेतील बालचित्रकारांच्या कुंचल्यातून साकार झालेले कलाविष्कार या दिनदर्शिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
ठाण्यातील सरस्वती मंदिर पूर्वप्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांच्या कार्यालयात गेल्यावर िभतीवरील बालनिर्णय ही दिनदर्शिका चटकन लक्ष वेधून घेते. गेली १० वर्षे दिनदर्शिकेची परंपरा येथे जोपासली जात आहे. दरवर्षी एका विषयाची निवड करून मोठय़ा शिशूच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून तो समजावून दिला जातो. आतापर्यंत बाल हक्क, पृथ्वी वाचवा, वर्षांचे सर्व सण, सूक्ष्म स्नायू, विकास घडवून आणणाऱ्या अ‍ॅक्टिव्हिटीज, शाळेच्या महिन्याचे अभ्यासक्रम आदी विषय हाताळले गेले आहेत. दिनदर्शिका ही नेहमी जानेवारी ते डिसेंबर अशी असे. मात्र शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेली ही दिनदर्शिका शैक्षणिक वर्षांप्रमाणे म्हणजेच जून ते मे अशी आहे. प्रत्येक पानावरील चित्र आणि खालील तारखा हे सगळे मुलेच तयार करतात. आपण काढलेल्या चित्रांची दिनदर्शिका जेव्हा भिंतीवर लावली जाते, तेव्हा मुलांना अतिशय आनंद होतो. मुलांवर आपण विश्वास टाकला तर ते तो विश्वास सार्थ करतात आणि त्यामुळेच ‘पृथ्वी वाचवा’, ‘शाळेचा अभ्यासक्रम’, ‘सण’ असे विषयदेखील मुले समजून घेऊन चित्रांतून तो मांडतात, असे मुख्याध्यापक रती भोसेकर सांगतात.
मैदानी खेळांच्या माध्यमातून मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास करण्याचा प्रयत्न ‘बालभवन’ या उपक्रमाच्या माध्यमातून केला जातो. बालवाडी ते १४ वर्षे अशा वयोगटातील मुले असल्याने ४-५ गटांत मुलांची विभागणी करण्यात आली आहे. ही मुलेदेखील डिसेंबर महिन्यात नववर्षांच्या स्वागतासाठी दिनदर्शिका तयार करतात. छोटय़ा गटातील मुले मुक्तपणे चित्र काढतात, तर मोठय़ा मुलांना विषय दिला जातो. मुले खूप असल्याने दरवर्षी चार-पाच दिनदर्शिका दरवर्षी तयार होतात.
भिन्नमती मुलांच्या विकसनासाठी कार्य करणाऱ्या ‘विश्वास’ या संस्थेच्या मुलांनी तयार केलेल्या चित्रांच्या दिनदर्शिका आपल्याला सुखद अनुभव देणाऱ्या आहेत. या दिनदर्शिका नेहमीपेक्षा खूपच वेगळय़ा आहेत. यावर महिना आणि वर्ष लिहिलेले नाही, तर १ ते ३१ अशा तारखा टाकलेल्या आहेत. त्यामुळे आपण ते बरीच वर्षे वापरू शकू, कारण भिन्नमती मुलांची ही चित्रे आपल्याला एका निरागस, निष्पाप अशा बालविश्वात घेऊन जातात. बऱ्याचदा लहान मुलांच्या चित्रातली झाडे, डोंगर, सूर्य, फूल यात बऱ्यापैकी साम्य दिसून येते. पण या मुलांसाठी चित्र काढण्याचा अनुभव म्हणजे एका कोऱ्या पाटीवरील श्रीगणेशा असतो आणि मनामध्ये कुठेतरी काहीतरी साठवलेले, आठवणीतले असे घेऊन त्यावर हुकूम काढण्याची वृत्ती इथे नाही. त्यामुळे प्रत्येक चित्र किंवा प्रत्येक कलाकार त्याच्या आवडीनुसार, त्याच्या आवाक्यानुसार त्याला आवडेल तसेच चित्र काढतो. त्यामुळे या ३१ चित्रांमधून आयुष्यभर लहान राहणारी अतिशय निरागस, निष्पाप मने आपल्याला अनुभवता येतात.
             – हेमा आघारकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Calendar by childrens