नवी मुंबई पालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची रखडलेली निवडणूक पुढील आठवडय़ात होणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. कोकण विभागीय आयुक्त राधेश्याम मोपलवार यांनी पीठासीन अधिकारी म्हणून येणार असल्याचे नगरसचिव विभागाला कळविले आहे. स्थायी समिती सदस्यसंख्येमध्ये राष्ट्रवादी काँग्रसेचे निर्विवाद वर्चस्व असल्याने या पक्षाचा सभापती होणार हे स्पष्ट असून यावेळची सभापतीपदाची माळ ज्याच्या प्रभागात जास्त मतदान झाले आहे, त्या राष्ट्रवादी सदस्याच्या गळ्यात पडणार असल्याचे संकेत आहेत.
नवी मुंबई पालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक दरवर्षी एक मे रोजी पार पडते. त्यापूर्वी समितीतील अर्धे सदस्य निवृत्त केले जातात. या वर्षी एकूण १६ सदस्यांपैकी वैभव गायकवाड, सुरेश शेट्टी, संजय पाटील, एम. के. मढवी, रामअशिष यादव, रतन मांडवे, जगदीश गवते, संतोष शेट्टी हे आठ सदस्य एप्रिल महिन्यात निवृत्त झाले.
त्यांच्याऐवजी एम. के. मढवी यांना पुन्हा संधी मिळाली तर भरत नखाते, अनंत सुतार, रविकांत पाटील, विठ्ठल मोरे, विजया घरत, सुरज पाटील, अमित पाटील हे आठ नवीन सदस्य नियुक्त करण्यात आले आहेत. जुन्या आणि नवीन अशा एकूण १६ सदस्यामधील एका सदस्याला पुढील आठवडय़ात सभापतीपदाची संधी मिळणार आहे. यात राष्ट्रवादीच्या सुरज पाटील यांची सभापतिपदाची संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे.
नवी मुंबईत आघाडीचे लोकसभा उमेदवार संजीव नाईक यांना केवळ सुरज पाटील यांच्या प्रभागात मतधिक्य मिळालेले आहे. दुसऱ्या ठिकाणी मिळालेले मतधिक्य नगण्य आहे. त्यामुळे लोकसभा मतदार संघासाठी प्रभागातील कामगिरीवर ही निवड अवलंबून आहे. एम. के. मढवी गेली अनेक वर्षे या स्पर्धेत गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत, पण त्यांच्या पत्नी विनया मढवी यांना फ प्रभाग समिती सभापतिपदी बसविण्यात आल्याने मढवी यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. यात पालकमंत्री गणेश नाईक यांचे हनुमान नगरसेवक भरत नखाते यांची वर्णीदेखील लागण्याची शक्यता आहे.
एक मे रोजी सभापतिपद अस्तित्वात येणे आवश्यक होते, पण निवडणुकांमुळे ते लांबणीवर पडले. कोकण विभागीय आयुक्ताचे नगर सचिव विभागाला पत्र प्राप्त झाल्याचे प्रभारी नगर सचिव चित्रा बाविस्कर यांनी स्पष्ट केले.
कोकण विभागीय आयुक्तांनी वेळ दिल्यानंतर ही निवडणूक लावली जाणार असून ही प्रक्रिया पुढील आठवडय़ात पार पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या निवडणुकीसाठी शिवसेना-काँग्रेस युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांनी महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांच्यासाठी काम केल्याचे स्पष्ट होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd May 2014 रोजी प्रकाशित
पुढील आठवडय़ात स्थायी समिती सभापतिपदाची निवड
नवी मुंबई पालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची रखडलेली निवडणूक पुढील आठवडय़ात होणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
First published on: 23-05-2014 at 07:19 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Committee chairman selection in next week