नवी मुंबई महापालिका मुख्यालयाच्या इमारतीचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे.  बेलापूर सेक्टर ५० येथे उभारण्यात येणाऱ्या पाच एकरावरील मुख्यालयाच्या इमारतीची शिल्लक राहिलेली बारीक सारीक कामे एक फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचा निर्धार महापालिका प्रशासनाने केला आहे. महापालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी या कामाचा नुकताच आढावा घेतला. या मुख्यालयाचे उद्घाटन १८ फेब्रुवारीला शरद पवार यांच्या हस्ते होणार असून यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत.
सिडकोच्या बेलापूर येथील एका आठ मजली इमारतीमधील काही मजले भाडय़ाने घेऊन नवी मुंबई महापालिकेचा कारभार सध्या सुरू आहे. कामाचा विस्तार वाढल्यामुळे महापालिका प्रशासनाने याच इमारतीमधील आणखी काही मजले विकत घेतले. मात्र स्वतंत्र मुख्यालय नसलेली पालिका असे एक बिरुद या महापालिकेच्या पुढे आजतागायत होते.यापाश्र्वभूमीवर सिडकोकडून मिळालेल्या बेलापूर येथील पामबीच मार्गालगत सेक्टर ५० मध्ये महापालिका मुख्यालयाच्या देखण्या इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. या इमारतीचे वैशिष्टय़ म्हणजे शेवटच्या मजल्यावरील सभागृह हे लोकसभा वास्तूची आठवण करून देणारे आहे. या इमारतीच्या आवारात राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभारले जाणार आहेत. तसेच या इमारतीसमोर २२५ फूट उंच एक राष्ट्रध्वज खासदार संजीव नाईक यांच्या प्रयत्नांमुळे उभारला जात असून तो देशातील दुसरा उंच ध्वज आहे.
दरम्यान, या मुख्यालयाच्या उभारणीच्या वाढीव खर्चावरुन वांदग होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत या इमारतीचा खर्च ८८ कोटी वरुन २०० कोटी कसा गेला याची माहिती मागितली आहे.