जातिपातींनी निर्माण केलेली विषमता, भेदभाव, शोषण दूर करून समतेवर आधारलेला समाज आपणाला निर्माण करायचा असल्यास थोर पुरुषांविषयी आदरभाव असायला हवा. मात्र कोणत्याही महामानवाला जातीमध्ये बंदिस्त करता कामा नये, असे मत इतिहास संशोधक प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केले.
शहरातील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर आयोजित दुसरे राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या वेळी उद्घाटक माजी न्या. बी. एन. देशमुख, स्वागताध्यक्ष संदीपान झोंबाडे, शिवाजी साळुंके, राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव धनंजय पाटील, एम. डी. देशमुख, अमरसिंह देशमुख आदी उपस्थित होते.
डॉ. साळुंखे म्हणाले, की अण्णा भाऊ साठे हे प्रतिकूल परिस्थितीत जन्माला आले. मात्र, साहित्यनिर्मितीसाठी असावी लागणारी संवेदनशीलता त्यांच्याकडे होती. कोटय़वधी माणसे दारिद्रय़ात राहण्यामागे शोषण आणि त्यांचे अज्ञान आहे, हे त्यांनी जाणले होते. मानवी मनाची घुसमट त्यांनी आपल्या साहित्यातून मांडली. प्रतिकूल परिस्थिती बदलून टाकण्यासाठी विद्रोह करू पाहणारा एक जिवंत ज्वालामुखी त्यांच्यामध्ये होता. श्रमिकांची एकजूट असली, तर शोषणाची व्यवस्था उलथवून टाकता येते, हे त्यांनी आपल्या साहित्य कृतीमधून दाखवून दिले आहे. विचारांचा हा धागा जपणारे अण्णा भाऊ असो वा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहूमहाराज, छत्रपती शिवराय, या महापुरुषांना जातीच्या बंधनात अडकवून ठेवू नये, असेही ते म्हणाले.
उद्घाटनपर भाषणात न्या. देशमुख यांनी अण्णा भाऊ साठे, महात्मा फुले, शाहू महाराजांसारख्या थोर पुरुषांनी समता, स्वातंत्र्याचा विचार मांडला. तो आपण पुढे घेऊन जात नाही, अशी खंत व्यक्त केली. महापुरुषांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा प्रकारच्या साहित्य संमेलनाची गरज आहे. त्याचबरोबर विविध जातिधर्मातील संघटनांनी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एकत्र येण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविकात स्वागताध्यक्ष झोंबाडे यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. उद्घाटन समारंभापूर्वी सकाळी शहरातील लहुजी वस्ताद साळवे चौक येथून ग्रंथदिंडी काढण्यात आली.