डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना आपल्या वाढदिवसाचे शहरभर फलक लावून आचारसंहितेचे उल्लंघन केले असल्याची तक्रार एका नागरिकाने जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी पी. वेलारासू यांच्याकडे केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त, प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे.

शनिवारी आमदार चव्हाण यांचा वाढदिवस होता. शहरातील विविध संस्था आणि व्यक्तींच्या नावाने शहरभर चव्हाण यांना शुभेच्छा देणारे ४७ फलक लावण्यात आले होते. शुभेच्छा देणाऱ्या संस्था, व्यक्तींनी महापालिकेकडे परवानगीसाठी केव्हा अर्ज केले. या संस्था नोंदणीकृत आहेत की नाहीत, एकाच दिवसात त्यांना कशी परवानगी देण्यात आली.   असा प्रश्नही या तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे. पालिकेच्या आदेशानुसार फलकांवर परवाना क्रमांक, दिनांक कालावधी नमूद करणे प्रशासनाने बंधनकारक केले असताना अशा कोणत्याही तरतुदीचे पालन करण्यात आले नाही, असे तक्रारदार भगवान भुजंग यांनी म्हटले आहे.  कल्याण-डोंबिवली पालिकेचे आयुक्त रामनाथ सोनवणे, उपायुक्त लहाने, स्थानिक निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांच्या भरारी पथकावर कारवाई करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे.
‘शुभेच्छा रीतसर परवानग्या घेऊनच’
आमदार रवींद्र चव्हाण यांच्या समर्थकांनी मात्र पालिकेच्या अत्यावश्यक परवानग्या, त्यांच्या दराप्रमाणे भरणा करून शहरात फलक लावण्यात आले. त्यानंतर परवानगी दिलेल्याच मुदतीत ते काढण्यात आले. त्यामुळे आचारसंहिता भंगाचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचे म्हटले आहे. केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने हा प्रकार सुरू असल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले. मालमत्ता विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रकाश ढोले यांनी सांगितले, आमदार चव्हाण यांना शुभेच्छा देण्यासाठी ४७ वेगळ्या संस्थांनी अर्ज केले होते. त्यांनी रीतसर भरणा केल्यानंतर उपायुक्तांच्या सहीने संस्थांना फलक लावण्याची परवानगी देण्यात आली आहे.