मुंबईकर प्रवाशांना गेल्या दोन अर्थसंकल्पांपासून दाखवण्यात येणारी गाजरे येत्या आर्थिक वर्षांत खरी ठरण्याच्या मार्गावर आहेत. पश्चिम रेल्वेवर एसी लोकलसाठी जुलै महिन्याचा मुहूर्त मिळाल्यानंतर आता हार्बर मार्गाचे गोरेगावपर्यंत विस्तारीकरण अंतिम टप्प्यात आले आङे. या मार्गावर जूनपासून उपनगरी रेल्वे सेवा सुरू होणार असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाचे प्रभात रंजन यांनी दिली. त्यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनल ते गोरेगाव आणि तिकडे पनवेलपर्यंतचा परिसर थेट उपनगरी रेल्वेने जोडला जाणार आहे.
ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असल्यापासून मुंबईकरांना अनेक घोषणा ऐकवण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्थानकांपासून ते उन्नत रेल्वेमार्गापर्यंत अनेक प्रकल्पांबाबत विविध रेल्वेमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात भाष्य केले. त्यापैकी वातानुकुलित लोकल गाडी, हार्बर मार्गाचे गोरेगावपर्यंत विस्तारीकरण, ओशिवरा रेल्वे स्थानकाची उभारणी या प्रकल्पांची मुंबईकर आतुरतेने वाट पाहत होते. मात्र हे सर्वच प्रकल्प सुरू होण्यास दिरंगाई होत होती. हार्बर मार्गाचे अंधेरीपासून गोरेगावपर्यंत विस्तारीकरण करण्यात भूसंपादनाचा प्रमुख अडथळा होता. हा मार्ग अंधेरी स्थानकातील सध्याच्या हार्बर मार्गापासूनच पुढे वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिमेकडील जमीन हस्तांतरित करणे गरजेचे होते. मात्र मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाने याबाबत उपाययोजना करत गरजेपुरती जमीन हस्तांतरीत केली. याच मार्गावर जोगेश्वरी पश्चिम येथे बेस्टचे बसस्थानक आहे. या स्थानकाची काही जमीन हार्बर मार्गाच्या विस्तारीकरणासाठी हस्तांतरित करणे गरजेचे होते. याबाबतचा प्रस्तावही बेस्टकडे पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला बेस्ट समितीच्या गुरुवारच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे आता हार्बर मार्गाच्या विस्तारीकरणामधील उरलासुरला अडथळाही दूर झाला आहे. परिणामी हे काम जूनपर्यंत पूर्ण होणार असून जूनअखेरीपर्यंत मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून गोरेगावच्या दिशेने लोकल गाडय़ा रवाना होतील.
सध्या हार्बर मार्गावर एकूण ५८५ सेवा धावतात. हार्बर मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या साडेसात लाखांपेक्षाही जास्त आहे. हा मार्ग वाशी-पनवेल आणि वांद्रे-अंधेरी-बोरिवली या दोन ठिकाणच्या प्रवाशांना सेवा देतो. ५८५ पैकी ९० सेवा वांद्रे व अंधेरी या मार्गावर चालवण्यात येतात. यात अंधेरीसाठी ४६ आणि वांद्रय़ासाठी ४४ सेवांचा समावेश आहे. तर एकच सेवा बोरिवलीपर्यंत चालवण्यात येते.
जूनपासून गोरेगावपर्यंत सेवा सुरू झाल्यास या सेवेचा फायदा गोरेगाव, कांदिवली, मालाड, जोगेश्वरी, अंधेरी आणि काही प्रमाणात बोरिवली पट्टय़ातील हजारो प्रवाशांना होणार आहे. या पट्टय़ातून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या आसपास कामाला जाणाऱ्या लोकांना चर्चगेट किंवा मरिन लाइन्स या स्थानकांवर उतरून बस किंवा टॅक्सीचा आधार घ्यावा लागतो. त्याऐवजी आता थेट छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत येता येईल. सध्या अंधेरी व वांद्रे या गाडय़ांपैकी काही गाडय़ा गोरेगावपर्यंत चालवल्या जातील, असे रेल्वेतर्फे सांगण्यात आले. तसेच पनवेल ते अंधेरी अशा लोकल आहेत. आता पनवेलपासून थेट गोरेगावपर्यंतचा पट्टा जोडला जाईल.