* चंद्रपूर जिल्ह्य़ात रिपरिप सुरूच
* एस.टी.चे लाखोचे नुकसान
* अडीच लाख हेक्टरवर पीकहानी
जिल्ह्य़ात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची रिपरिप सुरूच असून मूल व ब्रह्मपुरीत घर कोसळल्याने एका तेरा वर्षीय मुलीसह दोन जणांचा मृत्यू, तर दोन जण जखमी झाले. चंद्रपूर, भद्रावती व वरोरा तालुक्यात पूर परिस्थिती असल्याने हैदराबाद, यवतमाळ, वणी, वरोरा, ब्रह्मपुरी, गडचिरोली, राजुरा व मुकूटबन मार्ग सलग दुसऱ्या दिवशी बंद असल्याने एस.टी. महामंडळाचे लाखोचे नुकसान झाले, तर अतिवृष्टीमुळे या जिल्ह्य़ात २ लाख ६३ हजार ११० हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले असून २० व्यक्तींचा मृत्यू झाला, तर ८ हजार घरे कोसळली आहेत. नुकसानीचे सर्वेक्षण सुरू असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या शनिवारी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या जिल्ह्य़ातील पूरग्रस्त भागाचा दौरा करून मुंबईला जात नाही तोच गेल्या तीन दिवसांपासून अतिवृष्टी व पावसाची रिपरिप सुरू आहे. मंगळवारी दुपारी १२ वाजता सुरू झालेला पाऊस आज गुरुवारी अविरत सुरूच आहे. सततच्या पावसामुळे चंद्रपूर शहरातील नदी काठावरील कस्तुरबा व महात्मा गांधी या दोन्ही मार्गावर टोंगळय़ापर्यंत पाणी साचले असून इरई नदीकाठावरील पूरग्रस्त वस्त्या रहमतनगर, सिस्टर कॉलनी, नगीनाबाग, माधव टॉवर, हवेली गार्डन, मुस्तफा कॉलनी, आकाशवाणीनगर, स्वावलंबीनगर, महसूल कॉलनी, ठक्करनगर, जगन्नाथबाबानगर, गजानननगरी, विठ्ठल मंदिर वॉर्ड, दानववाडी, ओंकारनगर, वडगावनगर व केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाची कॉलनी, अंचलेश्वर वॉर्डात व एमईएल प्रभागात गौरी तलाव, आंबेडकरनगर, संजयनगर, इंदिरानगर, पठाणपुरा गेटबाहेर राजनगर, महाकालीनगरी, सहारानगरी, गजानननगरी, स्वामी विवेकानंदनगरी, महर्षी कॉन्व्हेंट, स्वामी समर्थनगरीत पुराचे पाणी शिरले आहे.
भद्रावती व वरोरा तालुक्यातीत गावात व शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने हजारो घरांची पडझड झाली आहे. भद्रावती व मूल तालुक्यात तर सलग दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने जवळपास एक हजार घरांची पडझड झाली आहे. मूल येथे काल बुधवारी रात्री १२ वाजता घर कोसळल्याने सलोनी संदीप ठिकरे या बारा वर्षीय मुलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर ब्रह्मपुरी तालुक्यातील ताडेगाव येथे घर कोसळून राईबाई शिवरकर या ६२ वर्षीय महिलेचा मृत्यू व दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पावसामुळे हैदराबाद, यवतमाळ, वणी, वरोरा, ब्रह्मपुरी, गडचिरोली, राजुरा व मुकूटबन मार्ग सलग दुसऱ्या दिवशी बंद असल्याने एस.टी. महामंडळाचे लाखोचे नुकसान झाले आहे. या जिल्ह्य़ातील जवळपास दहा पुलांवरून पावसाचे पाणी वाहन असल्याने मुख्य मार्गासह गावाचे अंतर्गत रस्तेही बंद झाले आहेत. इरई धरणाचे सात दरवाजे सलग तीन दिवसापासून दीड मीटरने उघडण्यात आल्याने इरई, झरपट व वर्धा नदीला पूर आला आहे. वैनगंगा नदीही धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे.
या जिल्ह्य़ाची पावसाची सरासरी ११४२.१४ मि.मी. असून १ ऑगस्टपर्यंत १३१३ मि.मी.पाऊस झाला आहे. जिल्ह्य़ात अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतीचे सर्वाधिक नुकसान वरोरा तालुक्यात झाले असून दुसरा क्रमांक भद्रावती तालुक्याचा लागतो. जिल्ह्य़ात २ लाख ६३ हजार ११० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वेक्षणाचे काम सुरू असून अंतिम अहवालानंतर नुकसानीची आकडेवारी स्पष्ट होणार आहे. चंद्रपूर १५ हजार ३८९, बल्लारपूर ७ हजार ३१२, मूल ६ हजार २६४, सावली १ हजार ७७८, पोंभुर्णा ७ हजार ६४, गोंडपिंपरी २२ हजार २३, वरोरा ६० हजार ७, भद्रावती २५ हजार ३५८, चिमूर १५ हजार ५८७, ब्रह्मपुरी २१ हजार ३६२, सिंदेवाही ४०८, नागभीड ६०१, राजुरा २२ हजार ३९३, कोरपना ६ हजार ९८७, राजुरा ४ हजार ३१७ हेक्टर शेतपिकाचे नुकसान झाले आहे. यात ५० टक्क्यांखालील व ५० टक्क्यांपेक्षा जास्त शेतपिकाच्या नुकसानीचा समावेश आहे. या जिल्ह्य़ात एक हजार हेक्टर शेतजमीन खरवडून गेली असून ४६६ हेक्टर वाहून गेली आहे. हे आकडे प्राथमिक असून अतिवृष्टी सुरूच असल्याने यात वाढ होणार आहे. अतिवृष्टीमुळे २० व्यक्तींचा मृत्यू झाला असून चंद्रपूर ३, बल्लारपूर २, मूल ३, सावली १, पोंभुर्णा १, भद्रावती ४, चिमूर २ व ब्रम्हपुरी ४ व्यक्तींचा समावेश आहे.
मृतांच्या वारसांना प्रशासनातर्फे २२ लाख ५० हजाराची मदत वाटप करण्यात आली असून मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येक एक लाखाची मदत देण्यात येणार आहे. या अतिवृष्टीमुळे ८६३ गावातील ७ हजार ९५१ कुटुंबे बाधित झाली असून आठ हजार घरांची पडझड झाली आहे. यात ६ हजार ५०१ घरांचे अंशत:, तर १ हजार २८० घरे पूर्णत: पडली आहेत. या नुकसानग्रस्तांना आतापर्यंत ६ लाख १६ हजार ८०० रुपये सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे. बाधित कुटुंबांची सर्वाधिक २९३० कुटुंबांची संख्या चंद्रपूर तालुक्यात आहे. ३ हजार २८९ कुटुंबांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आहे. या जिल्ह्य़ात आतापर्यंत पडलेल्या पावसाची आकडेवारी चंद्रपूर १५९२ मि.मी., बल्लारपूर १२५४, गोंडपिंपरी १३२४, पोंभूर्णा १२१४, मूल १२८२, सावली ११६३, वरोरा १५०८, भद्रावती १२५६, चिमूर १३११, ब्रम्हपुरी १५७२, सिंदेवाही १११३, नागभीड ११८८, राजुरा १२५७, कोरपना १३६७, जिवती १२९१ मि.मी. पावसाची नोंद घेण्यात आली. जिल्ह्य़ातील सर्व तालुक्यांनी पावसाची सरासरी ओलांडली आहे.
३ दिवसापासून इरईचे सर्व दरवाजे उघडे
इरई धरणाचे सात दरवाजे मंगळवारपासून दीड मीटरने उघडण्यात आल्याने इरई, झरपट, वर्धा नदीला पूर आला आहे. त्याचा परिणाम नदीकाठावरील वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. सलग तीन दिवसांपासून हे सातही दरवाजे उघडे असल्याने अनेक वस्त्या जलमय झालेल्या आहेत. त्याचा परिणाम अवघ्या पंधरवडय़ात जिल्ह्य़ात तिसरा पूर आला आहे, तर सर्व ११ सिंचन प्रकल्प १०० टक्के भरलेले आहेत. आसोलामेंढा, घोडाझरी, नलेश्वर, चारगाव, दिना, चंदई, अंमलनाला, लभानसराड, पकडीगुड्डम, डोंगरगाव प्रकल्प तुडुंब भरले आहेत.