भाडेपट्टय़ाची मुदत वाढवून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेणारा वक्फ बोर्डाचा मुख्य कार्यकारी अधिकारी नूर मोहम्मद पठाण याला आणखी दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
नांदेड जिल्ह्य़ातल्या कुंडलवाडी येथील एका जमिनीच्या भाडेपट्टय़ाची मुदत वाढवून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेताना वक्फ बोर्डाचा मुख्य कार्यकारी अधिकारी नूर मोहम्मद पठाण याला शनिवारी पकडण्यात आले होते. न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याने आज कोठडीची मुदत संपली होती. त्यानंतर त्याच्या कोठडीत आणखी दोन दिवस वाढ करण्यात आली.
पठाण याच्याकडील सापडलेली सव्वा कोटींची रक्कम, सुमारे २० ते २५ लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पण त्याची स्थावर व जंगम मालमत्ता आणखी शोधायची असल्याने पोलीस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद करण्यात आला. पठाण यांची बाजू मांडणाऱ्या अॅड. आर. एन. खांडील यांनी त्याला हरकत घेतली. तपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे कोठडीची गरज नाही. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पठाण याला आणखी दोन दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस उपअधीक्षक गजानन सैदैने यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, पठाण याच्या मालमत्तेची चौकशी आणखी बाकी आहे. स्थावर व जंगम मालमत्ता किती आहे व कोठे आहे याचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. या दोन दिवसात मालमत्ता शोधण्याचे काम पूर्ण होईल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान पठाणविरुद्ध यापूर्वी अनेक प्रकरणात तक्रारी झाल्या. परंतु वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. किनवट-माहूर-यवतमाळसह अनेक भागातल्या प्रार्थनास्थळाला देण्यात येणाऱ्या जागांबाबत त्यांनी अनियमितता केली होती. त्यांनी घेतलेले अनेक निर्णय वादग्रस्त ठरले होते. ३० हजारांच्या लाच प्रकरणानंतर आता पठाण यांनी वक्फ बोर्डात कार्यरत असताना घेतलेल्या वादग्रस्त निर्णयाबाबत स्वतंत्रपणे तक्रारी करण्याची तयारी काहींनी सुरू केली असल्याचे सांगण्यात आले.