चंद्रपूर, गडचिरोली आणि उत्तर नागपुरातील बचत गटावर सिटूचा तर नागपूर जिल्ह्य़ातील बचत गटावर आयटकचा प्रभाव आहे. काही अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधला असता त्यांनी दोन्ही संस्थांच्या वादाचा आणि आमच्या आंदोलनाचा काही संबंध नसल्याचे सांगितले. अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू असून याचे श्रेय केवळ अंगणवाडय़ा सेविकांना असून कुठल्याही संस्थेला नाही. दोन्ही संघटनांची वर्चस्वाची लढाई असेल तर त्यांनी करावी, आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी दोन्ही संघटना काम करीत असल्यामुळे दोघांसोबत असल्याचे सेविकांनी सांगितले.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचे श्रेय घेण्यासाठी आयटक आणि सिटू या दोन्ही संघटना सरसावल्या असून त्यांचे आंदोलन ‘हायजॅक’ करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली. दोन्ही संघटनांमध्ये श्रेय घेण्यासाठी धडपड सुरू असताना त्यात मात्र आंदोलनकर्त्यां महिला भरडल्या जात असून त्यांच्यासमोर कोणाकडे जावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अंगणवाडी कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून ६ जानेवारीपासून अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढ आणि इतरही काही मागण्यांसाठी निदर्शने, धरणे आणि मोर्चा काढून सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांची हिंदू मजदूर सभा संचालित अंगणवाडी कर्मचारी सभा (एचएमएस) असून या संस्थेच्या अध्यक्ष प्रमिला मर्दाने आहेत. सिटूचे गुरू प्रीतसिंग, अमृत मेश्राम आणि भीमराव खोब्रागडे तर आयटकचे श्याम काळे या अंगणवाडीच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
आयटक आणि सिटू या संस्थेचे अनेक बचत गट असून त्या माध्यमातून त्यांनी अनेकांना सदस्य केले आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात आयटकचा प्रभाव वाढत असताना सिटूच्या कार्यकर्त्यांनी आयटक प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आंदोलनासाठी आलेल्या बचत गटातील महिलांना आपल्याकडे खेचण्यासाठी दोन्ही संघटनांमध्ये स्पर्धा सुरू झाली. त्यामुळे गेल्या दोन तीन दिवसात दोन्ही संघटनांमधील पदाधिकाऱ्यांमध्ये श्रेय घेण्यावरून वाद सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या काही दिवसात आंदोलनात आयटकचे झेंडे आणि बॅनर लावले जात आहे त्यामुळे सिटूने त्यावर आक्षेप घेत सिटूचे झेंडे का नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे दोन्ही संघटनांमध्ये यावरून वाद उद्भवला.
या दोन्ही संघटनांमध्ये अंगणवाडी सेविकांची मात्र चांगलीच फरफट होत आहे. कधी नव्हे ते मोठय़ा प्रमाणात सेविका मागण्यांसाठी एकत्र आल्या असताना त्यांना सिटू आणि आयटकचे पाठबळ मिळाले. मात्र, या दोन्ही संघटनाच्या वादामुळे अंगणवाडी सेविकांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. आंदोलन सुरू करण्यात आले आहे त्यामुळे मागे हटायचे असा पवित्रा अंगणवाडी सेविकांनी घेतला आहे. त्यामुळे त्यांनी दोन्ही संघटनांच्या वादात न पडता आपण आपले काम करायचे या मानसिकतेमध्ये सेविका आहेत. संविधान चौकात आंदोलन सुरू असताना दोन्ही संघटनांचे पदाधिकारी सदस्य करण्यासाठी पावती बुक घेऊन बसतात.
जास्तीजास्त सेविकांनी सदस्य व्हावे यासाठी दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची धडपड सुरू असून अंगणवाडी सेविकांना आग्रह केला जात आहे.