अखेर ‘त्या’ महिला वनपालाची नियुक्ती रद्द

सेमिनरी हिल्सचे वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक नंदनवार यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्या जागेवरील नवनियुक्तीवरून उफाळलेल्या वादावर अखेरीस आज पडदा पडला.

सेमिनरी हिल्सचे वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक नंदनवार यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्या जागेवरील नवनियुक्तीवरून उफाळलेल्या वादावर अखेरीस आज पडदा पडला. नंदनवार यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या जागेवर कनिष्ठ महिला वनपाल अभिलाषा सोनटक्के यांच्या नियुक्तीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण होते. प्रसारमाध्यमांनीही या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उभे केले. अखेरीस अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. पी.एन. मुंडे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून ही नियुक्ती रद्द केली.
लकडगंज येथील महिला वनपाल अभिलाषा सोनटक्के सुरुवातीपासूनच वादाच्या गर्तेत अडकल्या आहेत. दीपक नंदनवार हे ३१ मार्चला वनपरिक्षेत्र अधिकारी पदावरून निवृत्त झाल्यानंतर उपवनसंरक्षक पी.के. महाजन यांच्या शिफारशीवरुन सोनटक्के यांची नियुक्ती या पदावर करण्यात आली. सेमिनरी हिल्स येथे अनेक वरिष्ठ वनपाल कार्यरत असताना सोनटक्के यांच्यावर वनविभाग एवढे मेहरबान का, यावरून विभागात चर्चा सुरू झाली. सुमारे चार ते पाच वर्षांंचा कार्यकाळ त्यांना या विभागात झाला आहे. मे २०१३ मध्ये त्यांनी एका ट्रकला तपासणी न करता वाहतूक परवाना दिल्यावरून वादळ उठले होते. या ट्रकची भंडाऱ्याच्या नाक्यावर तपासणी केल्यानंतर परवान्यापेक्षा अधिक माल त्यात असल्याचे आढळून आले. या प्रकरणात अभिलाषा सोनटक्के यांच्यावरील आरोपही सिद्ध झाले होते. अशा अनेक घटनांमध्ये त्या अडकल्या असतानाही त्यांची नियुक्ती झाल्याने इतर वरिष्ठ वनपालांमध्ये प्रचंड नाराजी होती. प्रसारमाध्यमांनीही यावर टीकेची झोड उठवल्यानंतर अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. पी.एन. मुंडे यांनी या प्रकरणाची दखल घेतली. सोनटक्के यांच्या नियुक्तीचे आदेश तातडीने रद्द करून वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन डवरे यांच्या नियुक्तीचे आदेश काढले. त्यासंदर्भातील पत्र त्यांनी आज मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभूर्णीकर यांना पाठवले. सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Lady forest officer appointment cancel

ताज्या बातम्या