ऑफिसला जाण्यासाठी घाईघाईत पोहोचलात.. प्लॅटफॉर्मवर जलद गाडी इंडिकेटरवर झळकत आहे.. गाडीची वेळ निघून गेली, तरी रेल्वेकडून गाडीबाबत काहीच माहिती मिळत नाही.. अशा परिस्थितीत असाल, तर आता गाडय़ांबाबतच्या अद्ययावत माहितीसाठी रेल्वेवर अवलंबून राहण्याची काहीच गरज नाही. आता १० जुलैपासून तुम्हाला ही माहिती ‘एम-इंडिकेटर’ या लोकप्रिय अ‍ॅपवरही मिळू शकणार आहे. त्यासाठी एम-इंडिकेटर मुंबईकर प्रवाशांचीच मदत घेणार आहे. एखादी गाडी उशिरा धावत असल्यास किंवा रद्द झाल्यास प्रवाशांना त्याबाबतची माहिती तातडीने या अ‍ॅपवर टाकता येणार आहे. ही माहिती ‘एम-इंडिकेटर’ वापरणाऱ्या लाखो प्रवाशांपर्यंत पोहोचू शकेल.
उपनगरीय गाडय़ांच्या वाहतुकीच्या कोणत्याही माहितीबाबत प्रवाशांना रेल्वेवर अवलंबून राहावे लागते. मात्र रेल्वेच्या उद्घोषणा कक्षातून अनेकदा उशिराने येणाऱ्या गाडय़ांबाबतची उद्घोषणाही १५-२० मिनिटे उलटून गेल्यानंतर होते. पर्यायाने प्रवाशांचा वेळ वाया जातो. यावर उपाय म्हणून ‘एम-इंडिकेटर’ या अ‍ॅपच्या १०.० या आवृत्तीत एक नवीन विभाग तयार केला जाणार आहे.
माहिती कशी मिळेल?
१० जुलैपासून एम-इंडिकेटरवर ‘लाइव्ह स्टेटस’ हा नवीन विभाग तयार करण्यात येईल. या विभागावर क्लिक केल्यास तेथे ‘रिपोर्ट’ आणि ‘इन्फो’ असे दोन पर्याय असतील. एखादी गाडी रद्द केली असल्यास किंवा उशिराने धावत असल्यास त्याची माहिती तुम्हाला इतरांना द्यायची असेल, तर ‘रिपोर्ट’ या पर्यायाची निवड करावी. त्यानंतर संबंधित गाडीची एखाद्या स्थानकावरील वेळ टाकून त्या गाडीबाबतची माहिती अद्ययावत करता येईल. ही माहिती ‘एम-इंडिकेटर’ वापरणाऱ्या लाखो प्रवाशांच्या मोबाइलवर पोहोचेल. गाडीबाबतची माहिती मिळवायची असल्यास या विभागातील ‘इन्फो’ या पर्यायाची निवड केल्यावर इतर प्रवाशांनी टाकलेली माहिती मिळणे शक्य होणार आहे.
त्याशिवाय या अ‍ॅपमध्ये आणखीही बदल होणार आहेत. मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जलद गतीने पोहोचण्यासाठी कोणत्या मार्गाने प्रवास करावा, याबाबत मार्गदर्शन करणारा ‘व्हाया’ हा पर्यायही आता या अ‍ॅपमध्ये असेल. तसेच नव्याने सुरू झालेल्या खोपोली बस सेवेची माहितीही या अ‍ॅपद्वारे मिळू शकेल.
प्रवाशांच्या सोयीसाठी
अनेकदा अचानक गाडय़ा रद्द होणे किंवा उशिराने धावणे यांमुळे प्रवाशांना मोठय़ा प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागतो. नेमक्या याच अडचणीचा विचार करून आम्ही एम-इंडिकेटरवर ही सेवा सुरू करत आहोत. मुंबईकर प्रवासी एकमेकांना मदत करण्यासाठी ओळखले जातात. आता ते एम-इंडिकेटर या अ‍ॅपद्वारेही एकमेकांची मदत करू शकतील. हा नवीन बदल प्रवाशांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.
सचिन टेके, व्यवस्थापक (एम-इंडिकेटर)