अपघातग्रस्तांना घटनास्थळी तातडीने उपचार मिळावेत यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने करोडो रुपये खर्च करून मोबाइल व्हॅन (फिरते रुग्णालय) खरेदी केल्या. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनाचे सोपस्कारदेखील प्रशासनाने पार पाडले. मात्र प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा अनुभव येथेदेखील आला आहे. करोडो रुपयांच्या व्हॅन सध्या धूळ खात पडल्या असून उद्घाटनाची घाई कशाला असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
नवी मुंबई परिसरातील सायन-पनवेल महामार्ग, ठाणे-बेलापूर मार्ग आणि पामबीच मार्गावर अपघातांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. या अपघातातील जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळत नसल्याने अनेकदा प्राण गमवावे लागतात. यासाठी अपघातग्रस्तांना घटनास्थळी तातडीने उपचार मिळावेत यासाठी महापालिकेच्या माध्यमातून फॅक मोबाइल रुग्णसेवा (फिरते रुग्णालय) सुरू करण्याच्या हेतूने फ्लोटिंग अ‍ॅडव्हान्स कॅज्युलिटी कॉम्प्लेक्स या अत्याधुनिक आरोग्यसेवा देणाऱ्या वाहन स्वरूपातील मोबाइल रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
यासाठी आरोग्य विभागाच्या सेवत दोन अत्याधुनिक मोबाइल व्हॅनदेखील दाखल झाल्या. त्याचे उद्घाटन प्रशासनाच्या वतीने मोठय़ा दिमाखात करण्यात आले. या सेवेचे उद्घाटनाचे सोपस्कार पार पडल्यामुळे त्या नागरिकांच्या सेवेत दाखल होतील असा विश्वास सर्वसामान्य नवी मुंबईकरांना होता. मात्र ही सेवा कार्यरत करण्यासाठी आवश्यक असलेला हेल्पलाइन क्रमांक प्रशासनाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. तसेच २४ तास सेवा देणाऱ्या या व्हॅनवर वैद्यकीय कर्मचारी नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने ही व्हॅन कार्यन्वित होऊ शकलेली नाही. यामुळे या व्हॅन सध्या वाशी येथील एका खाजगी रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत धूळ खात पडलेल्या असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरलेली आहे.
या संदर्भात आरोग्य विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक परोपकारी यांच्याशी संपर्क साधला असता काम प्रगतिपथावर असून लवकरच हेल्पलाइन क्रमांक जाहीर करण्यात येइल अशी माहिती त्यांनी दिली.  
फिरते रुग्णालय
* या पद्धतीने अत्याधुनिक आरोग्य सेवा पुरवणारी नवी मुंबई महानगरपालिका राज्यातील पहिलीच महानगरपालिका ठरणार आहे.
* अपघात ठिकाण समजण्यासाठी मार्गावरील विद्युत खांबांना क्रमांक देण्यात येणार असून अपघाताची माहिती देताना या क्रमांकाचा उपयोग होणार असून यामुळे  तातडीने रुग्णसेवा देणारे वाहन अपघातस्थळी पोहचण्यास मदत होणार आहे.
* या वाहनात अल्ट्रा सोनोग्राफी मशिन, एक्स-रे आदी अत्याधुनिक उपकरणे असल्याने त्याच ठिकाणी निदान व उपचार करणे शक्य होणार आहे. ही सेवा २४ तास विनामूल्य उपलब्ध असणार आहे.