सहकाऱ्यांकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या प्रणाली प्रदीप रहाणेच्या घटनेमुळे शहरात आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे पुढे आले आहे. मागील १७ महिन्यांत शहरात एकूण १४७ जणांनी आत्महत्या केली. जानेवारी २०१२ ते जुलै २०१३ या कालावधीत पोलीस ठाण्यांत दाखल झालेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यांची संख्या एकूण दोन हजार ९२३ इतकी आहे. त्यात घरफोडी व चोऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे सुमारे १२०० च्या जवळपास आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यांतील १ हजार २०९ आरोपींना अटक करण्यात आली तर सात कोटी तीन लाख ९५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे माहिती अधिकारात स्पष्ट झाले आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पां. भा. करंजकर यांनी पोलीस आयुक्तालयाकडून ही माहिती प्राप्त केली आहे. आत्महत्येच्या आकडेवारीचा विचार केल्यास महिन्याला नऊ जण आपली जीवनयात्रा या पद्धतीने संपवित असल्याचे दिसून येते. पोलीस आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये आत्महत्येचे उपरोक्त गुन्हे नोंदले गेले आहेत. सातपूरच्या बॉश कारखान्यात प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणारी प्रणालीला सहकाऱ्यांकडून मानसिक त्रास दिला जात होता. सततच्या त्रासाला वैतागून तिने घरात दोन्ही नसा कापून घेतल्या आणि छताला ओढणीने गळफास लावून घेतला. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचे निधन झाले. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्यांच्या बहुतेक घटनांमध्ये मानसिक ताण-तणाव हे कारण असल्याचे असल्याचे दिसून येते. काही वर्षांपूर्वी शहरात फोफावलेल्या गुन्हेगारीचा बिमोड करण्याचा प्रयत्न पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या मार्गदर्शनाखाली धडाक्यात सुरू झाला. त्याचे चांगले परिणाम दिसत असले तरी अधुनमधून गुन्हेगारी डोके वर काढत असल्याचे दिसून येते. मागील १७ महिन्यांच्या कार्यकाळात दाखल झालेल्या गुन्ह्यांवर नजर टाकल्यास ही बाब स्पष्ट होते. आयुक्त कार्यालयांतर्गत भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी, अंबड, इंदिरानगर, नाशिकरोड, उपनगर, आडगाव, देवळाली कॅम्प, सातपूर, गंगापूर ही पोलीस ठाणे कार्यरत आहेत. या सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत उपरोक्त काळात घडलेल्या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण घरफोडय़ांचे (१०८२) आहे. रात्रीची गस्त व तत्सम उपाय योजूनही हे प्रकार नियंत्रणात आलेले नाही. चोरीचे १०५ तर दरोडय़ाचे २६ गुन्हे दाखल आहेत. त्यात १२७ आरोपींना पकडण्यात आले. घरफोडय़ांच्या खालोखाल गुन्ह्यांचे प्रमाण आहे अपघातांचे. या कालावधीत शहरात तब्बल ८५४ लहान-मोठे अपघात घडले. त्यात १६२ जणांना प्राण गमवावे लागले. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अजुनही कायम असून विनयभंगाचे ९५ तर बलात्काराचे ३५ गुन्हे दाखल झाले आहेत.  गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी या मंडळींवर हद्दपारीचे अस्त्र उगारले. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद असणारे ७४ जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त कार्यालयाने म्हटले आहे.
*  मागील सतरा  महिन्यात १४७ आत्महत्या
* या कालावधीत वेगवेगळ्या स्वरूपाचे २,९२३ गुन्हे दाखल