जायकवाडीला पाणी मिळवण्यासाठी मराठवाडय़ातील लोकप्रतिनिधी गणेश विसर्जन न करण्याची धमकी देऊन मुख्यमंत्र्यांवर राजकीय दबाव निर्माण करीत आहेत. मात्र या दबावाखाली तसा निर्णय झाला तर मुख्यमंत्री व पाटबंधारेमंत्र्यांच्या विरोधात सर्वोच्च व उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा आमदार अशोक काळे यांनी दिला आहे.
आमदार काळे व याचिकाकर्ते कारभारी आगवण, सोमनाथ चांदगुडे, सचिन रोहमारे, बाळासाहेब घुमरे यांनी मुख्यमंत्री, पाटबंधारेमंत्री, प्रधान सचिव, कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता, नाशिक पाटबंधारे विभाग नाशिक यांना नोटिसा बजावल्या आहेत.
गोदावरी खो-याच्या धरणातील लाभक्षेत्रात मागील दोन वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाल्याने पिण्याचे पाण्याबरोबरच शेती पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून, मागील वर्षी पाटबंधारे विभागाच्या चुकीच्या माहितीमुळे दारणा व गंगापूर समूहावर बिगर सिंचनाचे ८० टक्केपर्यंत आरक्षण असताना दारणा धरणातून जायकवाडी धरणासाठी सोडलेले ३ टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे गोदावरी उजवा व डावा तट कालव्याचे रब्बी व उन्हाळी हंगामात सिंचनाचे आवर्तन होऊ न शकल्याने शेती पिकांचे व फळबागांचो कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले. भंडारदरा, मुळा व दारणा समूहातून सोडलेल्या ११.५ टीएमसी पाण्यापैकी ६ टीएमसी पाणी वाया जाऊन पोहोचलेले ५.५ टीएमसी पाणी पिण्यासाठी न वापरता शेतीसाठी व उद्योगासाठीच वापरले गेले. जायकवाडी धरणात २६ टीएमसी मृतसाठा तर ५ टीएमसी उपयुक्त साठा असताना उद्योग व अनधिकृत उपसा सिंचन योजना वाचविण्यासाठी जाणीवपूर्वक गोदावरी नदीच्या ऊध्र्व भागातील दारणा समूहातून पाणी सोडण्यात आले असा आरोप काळे यांनी केला आहे.
आवर्तनाची मागणी
गोदावरी उजवा व डावा तट कालवे बंद करून गोदावरी नदीपात्रात मात्र २२ हजार क्युसेसने पाणी सुरू आहे. चालू आवर्तनात लाभक्षेत्रातील नमुना क्रमांक ७ वर मागणी केलेले ५० टक्के सिंचन क्षेत्राला कपात करून पाणी दिले गेले. त्या राहिलेल्या क्षेत्रासाठी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लाभक्षेत्रातील साठवण तलाव, गावतलाव तसेच ओढेनाल्यांवरील बंधारे भरण्यासाठी गोदावरी कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी तातडीने सोडावे, अशी मागणीही आमदार काळे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जलसंपदामंत्री सुनील तटकरे, प्रधान सचिव, जलसंपदा विभाग व संबंधितांकडे केली आहे.