स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षा
स्थापत्य अभियांत्रिकी पेपर फुटीच्या प्रकरणात काही विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्यानंतर पुणे विद्यापीठाने आता पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबतची माहिती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे यांनी दिली. तसेच अभियांत्रिकीच्या पेपर तपासणीतील गोंधळाबाबत आलेल्या तक्रारींची चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे विद्यापीठामार्फत १२ नोव्हेंबर रोजी स्थापत्य अभियांत्रिकीचा ‘सेंट ऑफ मटेरियल’ या विषयाचा पेपर घेण्यात आला होता. पेपर सुरू होण्याआधीच ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर त्याची प्रश्नपत्रिका फिरत असल्याचे उघड झाले होते. या बाबत तक्रारी आल्यास चौकशी केली जाईल असे विद्यापीठाकडून सांगितले जात होते. विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाची बैठक कुलगुरुंच्या उपस्थितीत येथील क. का. वाघ महाविद्यालयात झाली. यावेळी पेपर फुटीचे प्रकरण आणि पेपर तपासणी प्रक्रियेबाबत अनेक विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या.
पेपर तपासणीतील गोंधळाचा फटका नऊ हजारहून अधिक विद्यार्थ्यांना बसला आहे. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती पाहिल्यावर काही प्रश्नांना गुण देण्यात आले नाही, काही प्रश्नांना कमी गुण दिले गेले असे प्रकार घडल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या. यावेळी आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडून त्यांची सोडवणूक करण्याची मागणी केली. पेपर फुटीच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला जाईल, असे गाडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. पेपर तपासणीतील गोंधळाची चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी सदर पेपर फुटीच्या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींना निलंबित करावे, अशी मागणी विद्यार्थी कृती समितीने केली होती.