ग्रामीण भागात शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान राबविले जात आहे. या मोहिमेचे यंदा सातवे वर्ष. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या मोहिमेच्या नाशिक विभागातील कामगिरीचा वेध मालिकेद्वारे घेण्यात येत आहे. मालिकेतील अठ्ठाविसावा लेख.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या माध्यमातून ग्रामीण तसेच शहरी भागातील लोकांची मानसिकता बदलणे, एकमेकांतील वादांवर नियंत्रण मिळवणे, सार्वजनिक उत्सव एकोप्याने साजरे करणे आदी उपक्रम राबविण्यात येत आहे. मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासकीय पातळीवर विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. तंटामुक्त गाव समितीच्या कामकाजात पोलीस पाटील महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, तालुका, पोलीस ठाणे व गावपातळीवर समित्यांची स्थापना केली जाते. प्रत्येक गावास तंटामुक्त गाव समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. या समितीमार्फत गावातील अस्तित्वातील तंटे व नव्याने निर्माण होणारे तंटे सामोपचाराने मिटविण्याची जबाबदारी असते. याशिवाय सार्वजनिक सण शांततेने साजरा करणे, जातीय व धार्मिक सलोखा राखणे, ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यरत करणे, अवैध धंद्यांना प्रतिबंध करणे, सामाजिक सुरक्षितता या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आखणीत तंटामुक्त गाव समितीची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. तंटामुक्त गाव मोहिमेचे यंदा सातवे वर्ष आहे. मोहिमेचा आजवरचा आढावा घेतल्यास समितीच्या कामकाजात ज्या ज्या गावात पोलीस पाटील हे पद रिक्त आहे, त्या त्या ठिकाणी अंमलबजावणीत संथपणा असल्याचे लक्षात येते. उत्तर महाराष्ट्रातील हजारो गावे दरवर्षी या मोहिमेत सहभागी होतात. त्यातील अनेक गावांमध्ये पोलीस पाटील हे पद रिक्त असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. तंटामुक्तीसाठी पात्र ठरण्याकरिता समिती व पोलीस प्रशासनाकडून प्रभावीपणे प्रयत्न केले जात असले तरी त्यात रिक्त पदांमुळे अडथळा निर्माण होत आहे.
वास्तविक, तंटामुक्त गाव समितीचे निमंत्रक म्हणून पोलीस पाटील काम पाहतात. बहुतांश पदे रिक्त असण्याची शक्यता गृहीत धरून शासनाने त्यावर जेथे अशी स्थिती असेल त्या ठिकाणी तलाठी या समितीचे निमंत्रक म्हणून काम पाहतील असे स्पष्ट केले आहे.
एवढेच नव्हे तर, ज्या गावात ही दोन्ही पदे रिक्त असतील, अशा ठिकाणी ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी हे काम पाहतील, असे म्हटले आहे. परंतु या घटकांनी दैनंदिन कामाच्या व्यापामुळे सामोपचाराने तंटे मिटविण्याची कामास पुरेसा वेळ देऊ शकत नाही. यामुळे मोहिमेच्या अंमलबजावणीत अवरोध निर्माण होत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.