जेएनपीटीमार्गे रक्तचंदनाच्या तस्करीच्या मालिका अद्यापही सुरू आहेत. असा कोटय़वधीचा माल पोलीस, वनविभाग आणि सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे. यानंतरही तस्करी सुरू असून या प्रकरणी न्हावाशेवा पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या माध्यमातून पोलीस तस्करीच्या मुळाशी पोहचण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचप्रमाणे तस्करीला आळा घालण्यासाठी जेएनपीटी बंदरावरील कंटेनर स्कॅनरची संख्या वाढविण्याची गरज आहे.
देशातील अत्याधुनिक बंदर म्हणून बिरूद मिरविणाऱ्या जेएनपीटी बंदरातून मागील अनेक वर्षांपासून रक्तचंदनाची तस्करी केली जात आहे. यांपैकी अनेक घटना उघडकीस आल्या असून शेकडो टन रक्तचंदनाचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. प्रामुख्याने देशाच्या दक्षिणेतील कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांतून रक्तचंदनाची मोठी संख्येने तस्करी करण्यात येते.
या रक्तचंदनाला चीन, रशिया तसेच युरोपात अधिक मागणी आहे. विविध आजारांवरील औषधे, महागडय़ा शोभेच्या वस्तू त्याचप्रमाणे विविध प्रकारची वाद्ये बनविण्यासाठी याचा वापर केला जातो.
बंदरातून अन्नधान्य निर्यातीच्या बहाण्याने परवानगी घेऊन कांदा, गहू, तांदूळ, कारपेट आदींच्या कंटेनरमधून रक्तचंदनाची तस्करी केली जात असल्याचे आजपर्यंतच्या प्रकरणांतून उघड झालेले आहे. यासाठी कंपन्यांची खोटी कागदपत्रे तयार केली जात असल्याचेही उघड झालेले आहे.