दिवाळी उत्सव १ नोव्हेंबरपासून सुरू होत असल्याने माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन २५ ऑक्टोबपर्यंत करण्याचे आदेश शिक्षण संचालक सर्जेराव जाधव यांनी दिल्याची माहिती शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील गाडगे यांनी दिली.
या मागणीसंदर्भात शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, गाडगे आदींनी शिक्षण संचालकांची भेट घेतली. त्या वेळी जाधव यांनी राज्यातील सर्वच माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी ऑक्टोबरमध्येच करावे, असे आदेश पूर्वीच दिल्याचे स्पष्ट केले.
शालार्थ प्रणालीतील पथदर्शी प्रकल्पाच्या मुंबई, पुणे, लातूर व ठाणे या चार जिल्हय़ांतील शिक्षक व शिक्षकेतरांचे वेतनही २५ ऑक्टोबरपूर्वी जमा करण्यासाठी, वेतन देयके पाच दिवस आधी कोषागार कार्यालयात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात सर्व शिक्षण उपसंचालकांना कार्यवाही करण्यास सांगितले गेले आहे.
शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष आबासाहेब लोंढे, मोहमद समी शेख, सुधीर शेडगे, प्रशांत कुलकर्णी, अजय बारगळ, आशा मगर, शोभना गायकवाड, विभावरी रोकडे, छाया लष्करे, आसमा बेग आदी उपस्थित होते.