जालना, औरंगाबाद व बुलढाणा जिल्ह्य़ात बँकांची एटीएम यंत्रे फोडणाऱ्या आंतरराज्य टोळीतील सातजणांना जालना पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री उशिरा अटक केली.
एटीएम मशिन्स फोडणारी टोळी महिंद्रा कंपनीच्या लाल रंगाच्या झायलो गाडीतून सिंदखेड राजाकडून नाव्हामार्गे जालन्याकडे येत असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेस मिळाली. त्यानंतर पोलिसांना जालना शहराजवळील नाव्हा चौफुलीजवळ या वर्णनाची गाडी दिसली. गाडी थांबविताच तिच्यातून शस्त्रांसह आठजण उतरले. त्यातील एकाने पोलीस कॉन्स्टेबल साई पवार यांच्यावर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या वेळी हल्लेखोरांशी झटापट करीत पवार यांनी त्यास नि:शस्त्र केले. आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले.
पकडलेल्या आरोपींनी पोलिसांना त्यांची सांगितलेली नावे – खलील अकबर कुरेशी (वय ३२), बिलाल अख्तर नवाज ऊर्फ पप्पूखान (वय ३२), महेबूब मखरूर पठाण (वय २३), सलीम नउरोअली चौधरी (वय ३१), कमरूल अजिजखाँ पठाण (वय ४५). हे पाचही आरोपी उत्तर प्रदेशातील रहिवासी, तर शशिकांत रामभाऊ शिंगणे (वय ४०) व रोहिदास बारकू खरात (वय ३८) हे दोघे आरोपी बुलढाणा जिल्ह्य़ातील आहेत. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून तलवार, दोन गावठी पिस्तुले, १० जिवंत काडतुसे, महिंद्रा कंपनीची गाडी व एटीएम मशीन फोडण्याचे साहित्य जप्त केले. या टोळीने बदनापूर, अंबड व भोकरदन (जालना), फुलंब्री (औरंगाबाद), जानेफळ व बीबी (बुलढाणा) येथील एटीएम फोडल्याची कबुली दिली.
या टोळीवर महाराष्ट्र व उत्तर प्रदेशात विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. जालना जिल्ह्य़ातील राजूर, बदनापूर व भोकरदन, औरंगाबाद जिल्ह्य़ातील अजिंठा, पैठण, सिल्लोड व दौलताबाद तसेच बुलढाणा जिल्ह्य़ातील देऊळगावराजा व खामगाव येथे एटीएम फोडण्याचा या टोळीचा कट होता, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनंत कुळकर्णी व उपनिरीक्षक दिलीप तेजनकर, विशेष कृती दलाचे उपनिरीक्षक श्रीकांत उबाळे व गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.