संगमनेरनजीक झालेल्या मोटार अपघातात श्रीरामपूर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सुनील लक्ष्मण शिरसाठ (वय ३०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत.
शहराला पाणीपुरवठा करणा-या जलवाहिनीचा वाॅल्व्ह नादुरुस्त झाला होता. तो आणण्यासाठी शिरसाठ, ठेकेदाराचे प्रतिनिधी मुकेश गोहिल व केशव सुधाकर लबडे हे औरंगाबादला काल गेले होते. तेथे वाॅल्व्ह मिळाला नाही. तो आणण्यासाठी ते मुंबईला गेले. मुंबईहून मोटारीने (एमएच १२ बीए ७१९३) श्रीरामपूरला येत असताना संगमनेर नाक्यावर त्यांची मोटार पलटी झाली. पहाटेच्या वेळी चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाला. अपघातात शिरसाठ यांचा मृत्यू झाला. तर गोहिल व लबडे यांना तांबे रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच मुख्याधिकारी संतोष खांडेकर, अभियंता सुतावणे, सभापती राजेंद्र महांकाळे हे घटनास्थळी गेले.
मृत शिरसाठ हे मूळचे भोसेगाव (ता.पाथर्डी) येथील रहिवासी असून त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा आहे. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. पालिका पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.