उपविभागीय अधिकारी कार्यालयासाठी अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी तालुक्यात वर्षभरापासून रस्सीखेच सुरू होती. परंतु, विविध स्तरावरून केलेल्या प्रयत्नांमुळे हे कार्यालय अर्जुनी मोरगाव तालुक्यालाच मिळेल, असे खात्रीलायक वृत्त आहे. सविस्तर असे की, दोन तालुक्यासाठी एक उपविभागीय अधिकारी कार्यालय, असे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार सडक अर्जुनी येथे हे कार्यालय देण्याची अधिसूचना संबंधित विभागानेोगेल्या वर्षी जारी केली होती. यावर अर्जुनी मोरगाव तालुक्यातून विविध स्तरांवर आक्षेप घेण्यात आले व हालचालींना वेग आला. यासाठी रोहयो मंत्री नितीन राऊत यांच्यासोबत कांॅग्रेस समिती सदस्य रत्नदीप दहिवले यांनी गेल्या हिवाळी अधिवेशनात व मार्चमध्येही महसूलमंत्र्यांशी चर्चा करून त्यांना वास्तविकता पटवून देऊन अर्जुनी मोरगाव तालुक्यालाच हे कार्यालय देण्याची मागणी केली. त्याचबरोबर उद्धव मेहंदळे यांच्या नेतृत्वाखाली या मागणीसाठी अर्जुनी मोरगाव तालुका सरपंच संघटनेने आंदोलन केले व तसे निवेदन तहसीलदारांमार्फत शासनाला पाठविले. सडक अर्जुनीला हे कार्यालय देण्याची अधिसूचना जारी झाल्याबरोबर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी विविध स्तरावर आक्षेप नोंदविले.
यात दोन्ही तालुक्यांचा तुलनात्मक तक्ता तयार करण्यात आलेला होता. यात दोन्ही तालुक्यातील भौगोलिक, राजकीय, शैक्षणिक, आरोग्यविषयक, क्षेत्रफळ, लोकसंख्या आदींची वास्तविक माहिती नमूद करण्यात आलेली होती. ही माहिती बघतांना उपविभागीय कार्यालय अर्जुनी मोरगाव येथे द्यायला हवे, अशी वस्तुस्थिती होती. यासाठी देवराम नेवारे, नवल चांडक, विजय डोये, दुर्योधन मंद, किशोर तरोणे, परेश उजवणे, दिनेश खोब्रागडे आदींनी विविध स्तरावर पत्रव्यवहारही केला. परंतु, या मागणीला राजकीय पाठबळ नव्हते. यासाठी न्यायालयात जाण्याचीही तयारी झाली होती. परंतु, नितीन राऊत व रत्नदीप दहिवले यांच्या प्रयत्नांमुळे या मागणीला राजकीय पाठबळही मिळाले.
वास्तविक परिस्थिती व सर्वाच्या विविध स्तरावरील प्रयत्नांमुळे अर्जुनी मोरगाव तालुक्याला उपविभागीय अधिकारी कार्यालय मिळाले आहे.
हे कार्यालय एक ऑगस्टपासून सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी अर्जुनी मोरगावचे तहसीलदार इमारतीचा शोध घेत आहेत. या वृत्ताला अर्जुनी मोरगावचे तहसीलदार संतोष महाले यांनीही दुजोरा दिला आहे. यामुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे व प्रयत्न करणाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे.