पृथ्वीचा बराच भाग हा महासागरांनी व्यापलेला आहे, सागरातून आपल्याला माशांच्या रूपाने एक मोठा अन्नस्रोत उपलब्ध झालेला आहे. पण अलीकडे प्रगत मासेमारी तंत्रामुळे माशांचे उत्पादन घटत चालले आहे. कारण माणसाचे क्रौर्य एवढे की, माशांची अंडीही गोळा केली जातील अशा जाळ्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट होण्याचा धोका आहे. सागरांचे प्रदूषणही मत्स्य व्यवसायास मारक ठरत आहे. मत्स्यशास्त्राचा अभ्यास असलेले इनेगिने लोक देशात आहेत, त्यातील एक म्हणझे डॉ. ए. रामचंद्रन. त्यांच्या निधनाने मत्स्यशास्त्राचा मोठा अभ्यासक आपण गमावला आहे.

शिक्षणतज्ञ व वैज्ञानिक अशी दोन्ही स्वरूपाची ओळख त्यांनी निर्माण केली होती. ‘केरळ युनिव्हर्सिटी ऑफ फिशरीज अँड ओशन स्टडीज’चे ते कुलगुरू होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर मत्स्यतज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती. त्यामुळेच ते ओमानच्या सुलतानांचे मत्स्य सल्लागार होते. मत्स्यविज्ञानातील अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय मंडळांवर ते सदस्य होते. रामचंद्रन यांचे वडील के.एस.एन मेनन हे स्थानिक काँग्रेसनेते व कोचिनचे महापौरही होते. मात्र रामचंद्रन यांनी राजकारणाशी कधी संबंध ठेवला नाही. नेदरलँड्समधील डेफ्ट तंत्रविद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली. आधी ते स्कूल ऑफ इंडस्ट्रियल फिशरीज ऑफ कोचिन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेचे संचालक होते नंतर ते केरळ युनिव्हर्सिटी ऑफ फिशरीज अँड ओशन स्टडीजचे कुलगुरू झाले. या विद्यापीठात त्यांनी मत्स्य व्यवसायाच्या आधुनिक गरजा ओळखून २० नवे अभ्यासक्रम सुरू केले. महासागर पर्यावरण व किनारा क्षेत्र व्यवस्थापन, हवामान बदल अभ्यास, पर्यावरण विज्ञान व आपत्ती व्यवस्थापन हे ते नवीन विषय होते. केरळमधील वेम्बानाड सरोवरातील प्लास्टिक प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी संशोधक म्हणून विशेष प्रयत्न केला होता.  रामचंद्रन वैज्ञानिक तर होतेच, पण विद्यार्थ्यांचा कल ओळखून, क्षमता वाढवणारे शिक्षणतज्ज्ञही होते. त्यांनी मत्स्यविज्ञानात काही अव्वल विद्यार्थी घडवण्याचे कामही केले. १३२ विद्यार्थ्यांना त्यांनी संशोधनासाठी मार्गदर्शन केले.

त्यांच्याच नेतृत्वाखाली गेल्या नोव्हेंबरात पहिली ‘इंटरनॅशनल ब्लू इकॉनॉमी काँग्रेस’ भारतात झाली होती. यापूर्वी आपण अन्नधान्य उत्पादनातील ‘हरित क्रांती’, दुग्धोत्पादनातील धवल क्रांती’ पाहिली. देशाला त्यापलीकडे, मत्स्य उत्पादन वाढीशी निगडित ‘नीलक्रांती’कडे नेणाऱ्यांपैकी महत्त्वाचे तज्ज्ञ असलेल्या रामचंद्रन यांचे जाणे हे देशासाठी मोठी पोकळी निर्माण करणारे आहे.