प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना, आपल्या आवडीचा कोणता विषय कसा उपयोगात आणता येईल, हे सुचायलाही प्रतिभा लागते. अच्युत गोखले यांच्याकडे ती होती. अन्यथा भारतीय अभिजात संगीताची त्यांची आवड संगीतप्रेमी नागभूमीतील प्रश्न सोडवण्यास उपयोगी पडली नसती. नागालँड राज्यात १३ वर्षे विविध पदांवरून गोखले यांनी जे काम केले, ते नंतरच्या काळात पथदर्शी ठरले. त्या राज्याचे मुख्य सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले, त्यापूर्वी दुर्लक्षित राहिलेल्या या राज्यातील ग्रामीण विकासाचे त्यांनी तयार केलेले आणि अंमलबजावणीत आणलेले ग्रामीण विकास मंडळाचे प्रारूप अन्य राज्यांसाठीही अनुकरणीय ठरले. या प्रारूपात प्रत्येकाची जबाबदारी स्पष्टपणे निर्धारित केलेली असल्याने, त्याच्या अंमलबजावणीत फारसे अडथळे आले नाहीत. मुळात अच्युत गोखले यांनी आयुष्यातील कामगिरीची सुरुवात नौदलात केली. ‘आयएनएस विनाश’ या क्षेपणास्त्रसज्ज जहाजावर त्यांनी पाकिस्तानबरोबरच्या ७१ च्या युद्धात अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर ७३ मध्ये ते प्रशासकीय सेवेत दाखल झाले आणि नागालँडमध्ये गेले. ‘नागा चळवळी’च्या नेत्यांशी १९७५ मध्ये केंद्र सरकारने केलेल्या शांतता कराराच्या वेळीही गोखले यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. पुढे केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयात सहसचिव म्हणून काम करीत असताना ग्रामीण रोजगाराला चालना देणाऱ्या ‘जवाहर रोजगार योजने’ची उभारणीही त्यांनी केली. ग्रामपंचायतींना थेट निधी पुरवून त्याचा विनियोग रोजगार निर्मितीसाठी कसा करता येऊ शकेल, याबद्दल त्यांनी तयार केलेली योजना सरकारने स्वीकारली. पंचायती राजबाबत घटनात्मक दुरुस्ती करून ती योजना देशभर लागू करण्यात आली. ग्रामविकास मंडळ आणि जवाहर रोजगार योजना या दोन्ही संकल्पनांची आखणी आणि अंमलबजावणीतील यशाबद्दल त्यांना १९९० मध्ये ‘पद्माश्री’ किताब मिळाला. नागा बंडखोरांचा प्रश्न तीव्र होत असतानाच्या काळात नागालँडमधील शेतीच्या परंपरागत पद्धतीत बदल घडवून आणणारी अभिनव योजना, हे गोखले यांच्या कारकीर्दीतील आणखी एक मोठे यश होते. त्यामुळे ते संपूर्ण राज्यात लोकप्रिय अधिकारी ठरले. गोखले यांना छायाचित्रणाची आवड होती. भारतीय उपखंडातील वनस्पतींची छायाचित्रे आणि त्याबद्दलची साद्यंत माहिती देणारा माहितीचा स्रोत गोखले यांच्या नावावर जमा आहे. ‘सिग्नेचर ऑफ प्लॅन्ट्स थ्रू कॅमेरा’, ‘पानीखेती ऑन माऊंटन स्लोप्स’ व ‘यूज ऑफ अल्डर ट्री’ या त्यांच्या शोधनिबंधांचेही सर्वत्र कौतुक झाले. त्यांच्या निधनाने भारतीय प्रशासकीय सेवेतील एक अनुभवसंपन्न, सर्जनशील अधिकारी हरपला आहे.