13 July 2020

News Flash

कॉ. माधवराव गायकवाड

सात दशकांहून अधिक काळ ते भाकपशी एकनिष्ठ राहिले. त्यांचा उत्साह राजकारण, समाजकारणात येणाऱ्यांना चकित करणारा होता.

कॉ. माधवराव गायकवाड

अखेरच्या श्वासापर्यंत शेतकरी, शेतमजूर, कामगारांच्या प्रश्नांवर तळमळीने लढणारा नेता म्हणजे स्वातंत्र्यसेनानी कॉम्रेड माधवराव बयाजी गायकवाड अर्थात बाबूजी. वयाच्या ९५व्या वर्षांपर्यंत ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या उपक्रमांत सहभागी होत राहिले, मार्गदर्शन करीत राहिले. किसान सभेच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठीच्या आंदोलनात ते सहभागी झाले. बाबूजींच्या निधनाने कष्टकऱ्यांचे लढाऊ  नेतृत्व हरपल्याची व्यक्त होणारी भावना, त्यांच्या कामाची साक्ष देत आहे.

सात दशकांहून अधिक काळ ते भाकपशी एकनिष्ठ राहिले. त्यांचा उत्साह राजकारण, समाजकारणात येणाऱ्यांना चकित करणारा होता. मनमाड हे त्यांचे जन्मगाव. तीच कर्मभूमीदेखील. छत्रे हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेऊन त्यांनी काही काळ रेल्वेत नोकरी केली. लढाऊ वृत्ती असणाऱ्या बाबूजींनी गोवा मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सहभाग घेतला. राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांना त्यांची जमीन परत मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला. प्रदीर्घ काळ चाललेले आणि यशस्वी झालेले ते ऐतिहासिक आंदोलन ठरले. कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याबरोबर विधिमंडळात ते अव्याहतपणे पाठपुरावा करायचे. विधान परिषदेचे सदस्य, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार, थेट जनतेतून निवडून मनमाडचे नगराध्यक्ष आदी जबाबदारी त्यांनी नेटाने सांभाळली. आमदारकीच्या काळात कष्टकरी, शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांवर त्यांनी सरकारला धारेवर धरले. विषयाचा परिपूर्ण अभ्यास, परखड मांडणी यामुळे बाबूजी विधानसभेत भाषणाला उभे राहताच सर्व सभागृह शांत होऊन त्यांचे विचार ऐकले जात. किसान सभेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक लढे उभारले. १९७४ मध्ये त्यांची भाकपचे राज्य संघटनेवर सचिव म्हणून निवड झाली.  सहकार क्षेत्रातही त्यांनी काम केले. नांदगाव तालुक्यातील अनकवाडे येथील शेतकऱ्यांना एकत्र आणून एकत्रित शेती विकास योजना राबविली. शेतकऱ्यांसाठी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, हाऊसिंग सोसायटी, पतसंस्था स्थापन केली. आमदार, मंत्र्यांची सहकारी संस्था स्थापन करून मुंबईत, वरळी येथे सुखदा हाऊसिंग सोसायटीच्या उभारणीत पुढाकार घेतला. पिण्याच्या पाण्याची भ्रांत असणाऱ्या मनमाड शहरासाठी सध्या अस्तित्वात असलेली पालखेड-पाटोदा पाणीपुरवठा योजना त्यांच्या आमदारकीच्या काळात पूर्ण झाली. आजही याच योजनेतून शहराला पाणीपुरवठा होतो. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी किसान सभेने उभारलेल्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. बाबूजी सर्वसामान्यांचे नेते असल्याने शासनाला त्यांची मागणी, आंदोलनाची दखल घ्यावी लागे. तळागाळातील घटकासाठी सर्वस्व हरपून काम करणाऱ्या ज्येष्ठ, अनुभवी नेत्याला महाराष्ट्र पारखा झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2018 1:08 am

Web Title: c madhavrao gaikwad profile
Next Stories
1 प्रा. अविनाश डोळस
2 स्वाती चतुर्वेदी
3 निमा कुलकर्णी
Just Now!
X