महाराष्ट्रातील संस्कृती, विशेषत: लोकसंस्कृती कशी विकसित होत गेली याचा अभ्यास करण्यासाठी पाणी हा इतिहासाचा केंद्रबिंदू मानून ज्यांनी अभ्यास केला, त्यात डॉ. रा. श्री. मोरवंचीकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांना अलीकडेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ‘जीवन साधना’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मराठवाडा हा प्रदेश मराठी बोलणाऱ्यांचा. जसे तेलंगणामध्ये तेलुगू, कर्नाटकात कन्नड बोलणारी मंडळी तसेच मराठीचा प्रदेश म्हणजे मराठवाडा. हा प्रदेश एका अर्थाने शुष्क. त्यामुळेच यातील लोकसंस्कृतीचा इतिहास नदीचा भोवताल घेऊन मांडला गेला नव्हता. तसा अभ्यास करून तो आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडणारे, म्हणून मोरवंचीकर यांचे नाव इतिहासतज्ज्ञांमध्ये अग्रेसर आहे. प्रागैतिहासिक काळातील पुरावे शोधत पाणी हे इतिहास लेखनाचे साधन आहे, असे सांगत मोरवंचीकरांनी जलसंस्कृतीची मांडणी भारतीय मानसिकतेने केली. त्यासाठी त्यांनी सातवाहनांवर मूलभूत काम केले. अश्मक-मूलक, पेतनिक, मौर्यसत्ता आणि सातवाहन, त्यातील वेगवेगळे राजे याचा अभ्यास असणारा त्यांचा ‘प्रतिष्ठान ते पैठण’ हा ग्रंथ त्यामुळेच महत्त्वपूर्ण मानला जातो. इतिहासाचे प्राध्यापक म्हणून ४० वर्षे काम करताना मोरवंचीकर यांनी पैठणमध्ये उत्खननही केले. दौलताबादच्या किल्ल्यात, एवढय़ा उंचीवर मोगल काळातील स्थापत्य अभियांत्रिकी कशी विकसित होती, याचा त्यांनी अभ्यास केला. मलिक अंबरने राजाच्या सुरक्षेसाठी म्हणून पाणवठाच किल्ल्यामध्ये आणला. या अभ्यासातून त्यांनी जगभरातील लोकसंस्कृतीचा पाण्याचा अंगाने अभ्यास करायला सुरुवात केली. पैठण, दौलताबाद, अजिंठा लेणी हा ऐतिहासिक ठेवा का जपला जावा आणि त्यातून नव्या पिढीने नक्की काय घ्यावे, याची मांडणी मोरवंचीकर अनेक वर्षे आवर्जून करत आहेत. इतिहासातील वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारी त्यांची ५२ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. शुष्क नद्यांचे आक्रोश, जलसंस्कृती- व्याप्ती आणि स्वरूप ही पुस्तके पाणी क्षेत्रातील अभ्यासकांना आजही उपयोगी पडतात. इतिहासातील पाणीदारपणा शोधताना त्याची जनजागृती व्हायला हवी, यासाठी भारतीय जलसंस्कृती मंडळही त्यांनी सुरू केले होते. इतिहासात देशभरातील पाणी व्यवस्थापनाच्या पद्धतीवर त्यांनी केलेले काम अनेकांना प्रेरणादायी आहे. ‘नकाशांमध्ये सर्वसाधारणपणे नद्या दाखवायच्या असतील तर रेषांना आकाशी रंग दिला जातो. आता परिस्थिती अशी आहे की भविष्यात त्या लाल रंगाने दाखवायला लागतील. हा लाल रंग कदाचित रक्ताचाही असू शकतो,’ असे ते आवर्जून सांगतात. अशा विपरीत स्थितीत पाण्याच्या अंगाने इतिहास पाहायला हवा. तसा अभ्यास करताना ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे म्हणून मोरवंचीकर यांनी न्यायालयातही लढा दिला होता. इतिहासाच्या वारशाला धर्म आणि जात नसते. तो जपला तरच त्यातून त्या काळातील लोकसंस्कृती कळू शकते, असा विचार वयाच्या नव्वदीत ते मांडत राहतात. त्यामुळे ज्या विद्यापीठात त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केले, त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने त्यांचा ‘जीवन साधना’ सन्मान देऊन गौरव करणे यथोचितच मानले जात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Aug 2019 रोजी प्रकाशित
डॉ. रा. श्री. मोरवंचीकर
मराठवाडा हा प्रदेश मराठी बोलणाऱ्यांचा. जसे तेलंगणामध्ये तेलुगू, कर्नाटकात कन्नड बोलणारी मंडळी तसेच मराठीचा प्रदेश म्हणजे मराठवाडा.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 24-08-2019 at 02:50 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr r s morvanchikar mpg