नवतेचा ध्यास मनात असेल तर ती अस्वस्थता स्वस्थ बसू देत नाही. त्यामधून नवीन काही निर्माण होते. आपले कार्यकर्तृत्व सिद्ध केल्याचा एक आनंद त्या नवतेमध्ये असतो; त्याचबरोबर समाजाला आपण आहे त्यापेक्षा वेगळे काही तरी देतो याचा एक स्वान्तसुखाय आनंद काही मंडळी घेतात. अशाच पठडीमधले एक व्यक्तिमत्त्व होते ‘आयडियल रोड बिल्डर्स’ कंपनीचे (आयआरबी) संस्थापक दत्तात्रय पांडुरंग म्हैसकर.

स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर म्हैसकर यांनी उमेदीच्या काळात खासगी तसेच मुंबई पालिकेत अभियंता म्हणून कामाला सुरुवात केली. नोकरीच्या चौकटीत अडकून पडलो तर वेगळे काही करता येणार नाही, असा विचार त्यांनी केला. रस्तेबांधणी क्षेत्रात उतरू, या विचारातून त्यांनी ‘आयआरबी’ कंपनीची स्थापना केली. डोंगर-दऱ्यात पसरलेला महाराष्ट्र एक दिवस औद्योगिक, उद्योग व्यवसायाकडे वाटचाल करील. वाढत्या लोकवस्तीबरोबर नागरीकरण वाढेल. या वाढत्या वस्तीला रस्ते सुविधेची प्राथमिक गरज असणार आहे. हा भविष्यवेध समोर ठेवून त्यांनी रस्तेबांधणी क्षेत्रात पाऊल ठेवले. चोख काम करण्याच्या वृत्तीमुळे ‘आयआरबी’ कंपनीला  अनेक रस्त्यांची कंत्राटे मिळाली. अर्थात, यामध्ये व्यावसायिक खंबीरता जशी होती; तशीच सरकार पातळीवर असलेले पारदर्शक व्यक्तिमत्त्व म्हणून असलेले वजन, राजकीय आशीर्वादही तितकाच महत्त्वाचा ठरला. आपल्या रस्ते कामाच्या दबदब्यातून त्यांनी तसा ठसा सरकारदरबारी निर्माण केला. महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे रस्ते त्यांनी बांधून दिले. सरकारशी चांगले ‘सूत’ असल्याने काही कामे त्यांनी ‘बीओटी’ (बांधा, टोल आकारून वापरा, हस्तांतर करा) तत्त्वावर पूर्ण केली.  वाहनमालक, चालकांना दर्जेदार रस्ते मिळाले. आयआरबीचे कौतुक झाले. अनेक व्यवसाय, व्यवहारांमध्ये मध्यस्थ असतात; पण टोल म्हणजे थेट लोकांच्या खिशात हात घालून वसुलीचा प्रकार असल्याने, या व्यवसायात थेट मध्यस्थ नसल्याने जागोजागीच्या टोलवसुलीमुळे  लोकांच्या रोषाला अप्रत्यक्षपणे ‘आयआरबी’ला सामोरे जावे लागले. या टोलवसुलीवरून न्यायालयीन याचिका सुरू आहेत. कायद्यातील करार त्रुटीचा लाभ घेणारे काही गैरप्रकार या टोलवसुलीत असल्याने ‘आयआरबी’ला लोकरोषालाही सामोरे जावे लागले. मात्र या ‘टोल’च्या गणिताच्या आधारे बँक-कर्जासाठी तारण मिळवून, महाराष्ट्रातील रस्तेबांधणीसाठी भांडवलनिर्मितीचा मार्ग खुला करणारे दत्तात्रय म्हैसकरच!

कंपनीच्या दैनंदिन व्यवहारातून त्यांनी निवृत्ती पत्करली होती, पण याच वेळी कौटुंबिक दुफळीतून कंपनीचे दोन भाग पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली.  त्यांच्या निधनाने डोंबिवलीतील एक दानशूर व उद्योगी व्यक्तिमत्त्व हरपले आहे.