30 May 2020

News Flash

नाना भिडे

गेल्या शतकाच्या पूर्वार्धात दळणवळणाची विशेष सुविधा नसताना नानांनी रत्नागिरीत अकरावीपर्यंतचे शिक्षण घेतले.

नाना भिडे

कोकण म्हणजे नररत्नांची खाण, असे अनेकदा अभिमानाने सांगितले जाते. त्याच्या पुष्टीसाठी लोकमान्य टिळक किंवा महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतच्या कर्तबगार महापुरुषांचे दाखलेही दिले जातात. ते निर्विवाद असले तरी या भूमीत उद्यमशीलतेचा मोठा अभाव आजही दिसून येतो. या पार्श्वभूमीवर कोकम, करवंदे, आंबा, फणस, काजू यांसारख्या अस्सल कोकणी रानमेव्यावर प्रक्रिया केलेली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात रत्नागिरीच्या ‘योजक असोसिएटस’चे सर्वेसर्वा कृष्णा परशुराम ऊर्फ नाना भिडे कमालीचे यशस्वी ठरले, एवढेच नव्हे तर तोपर्यंत दुर्लक्षित, उपेक्षित अशा या रानमेव्याला बाजारपेठेत त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. सुमारे नव्वद वर्षांचे कृतार्थ जीवन जगलेल्या नानांचे नुकतेच निधन झाले.

गेल्या शतकाच्या पूर्वार्धात दळणवळणाची विशेष सुविधा नसताना नानांनी रत्नागिरीत अकरावीपर्यंतचे शिक्षण घेतले. सुमारे पन्नास-साठ वर्षांपूर्वी वडिलोपार्जित हॉटेलचा व्यवसाय सांभाळतानाच केवळ तेवढय़ावर समाधान न मानता ‘योजक असोसिएटस्’ या नावाने नवीन उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली आणि सर्वप्रथम कोकम सरबताचे व्यावसायिक उत्पादन बाजारात आणले. त्या पाठोपाठ करवंद, जांभूळ, कुडा या वनस्पतीची फुले, डोंगरी आवळा इत्यादी रानमेव्यासह करवंद वडी, जॅम, जांभूळ ज्यूस, नाचणी सत्त्व, आवळा सरबत, पेठा, मावा अशी प्रक्रिया केलेली दर्जेदार उत्पादने बाजारात आणली. आकर्षक पॅकिंग आणि वाजवी दरामुळे ही सर्व उत्पादने देश-विदेशातील ग्राहकांच्या पसंतीला उतरली. या बेजोड कामगिरीमुळे नाना सांगलीच्या व्यापारमित्र पुरस्कार (१९९७) आणि वसईच्या भाऊसाहेब वर्तक पुरस्काराचे (२००१) मानकरी ठरले .

उद्योग सांभाळतानाच नानांनी अभिनय आणि वाचनाचा छंदही जाणीवपूर्वक जोपासला होता. त्याचबरोबर, हौशी नाटय़संस्था, वाचनालये शैक्षणिक संस्थांना वेळोवेळी उदार हस्ते मदतही केली.

फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज (रत्नागिरी), सेंट्रल कन्झ्युमर्स स्टोअर्स, भारत शिक्षण संस्था, पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, चित्पावन ब्राह्मण संघ, रत्नागिरीची वेदपाठशाळा, चिंचखरीतील दत्तमंदिर इत्यादी संस्थांच्या सामाजिक उपक्रमांमध्येही नानांचा मोलाचा सहभाग राहिला. या कार्याबद्दल त्यांना साने गुरुजी आदर्श व्यक्ती पुरस्कार, ग्रंथमित्र पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषदेचा लोकमान्य टिळक पुरस्कार, ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.

या कर्तबगारीबरोबरच नानांचे कोकणच्या दृष्टीने सर्वात मोलाचे योगदान म्हणजे, त्यांच्या बहुसंख्य उत्पादनांसाठी कच्चा माल स्थानिक पातळीवर मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने आणि कृतीही सुलभ असल्यामुळे महिला बचत गटांसह विविध आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांनी गावोगावी अशाच स्वरूपाचे प्रक्रिया उद्योग सुरू केले आणि यशस्वीपणे चालवले आहेत. हे उद्योग ‘योजक’ इतके यशस्वी नसतील, पण त्यातून या घटकांसाठी उत्पन्नाचे हुकमी साधन उपलब्ध झाले आहे. संस्कृत सुभाषितातील ‘योजकस्तत्र दुर्लभ:’ अशा स्थितीत योजकतेची दिशा नानांनी स्वकर्तृत्वाने दाखवून दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 12:01 am

Web Title: nana bhide profile abn 97
Next Stories
1 डॉ. हर्षवर्धन
2 रॉबर्ट मे
3 प्रा. अनीसउज्जमान
Just Now!
X