15 January 2021

News Flash

पद्मा सचदेव

टूट जाते हैं कभी किनारे मुझ में, डूब जाता है कभी मुझ में समंदर मेरा..

टूट जाते हैं कभी किनारे मुझ में, डूब जाता है कभी मुझ में समंदर मेरा.. या शब्दांमध्ये कवितेचे सारे मर्म आहे, असे त्या सांगतात. वयाच्या चौदाव्या वर्षी पहिली कविता त्यांनी लिहिली. काश्मिरी निसर्गसौंदर्याच्या कुशीत वाढलेली ती मुलगी नंतर डोगरी भाषेतील पहिली महिला कवयित्री ठरली, नुकताच त्यांना सरस्वती सम्मान जाहीर झाला आहे, त्यांचे नाव पद्मा सचदेव. हा पुरस्कार पंधरा लाखांचा असून तो सर्व भारतीय भाषांसाठी आहे, यापूर्वी तो विजय तेंडुलकर, एस. एल. भैरप्पा, हरिवंशराय बच्चन आदींना मिळाला आहे.
२००७ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘चित्त चेते’ या आत्मचरित्रासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. त्यांनी एकूण साठ पुस्तके लिहिली आहेत. त्यांची ओळख कवी व कादंबरीकार अशी आहे. पद्मा यांचे वडील प्रा. जयदेव शर्मा हे संस्कृतचे विद्वान होते, त्यामुळे त्यांना त्या भाषेचे ज्ञान होते. संस्कृत श्लोक त्यांना तोंडपाठ आहेत. त्यामुळे साहित्य व संस्कृतीचा वारसा त्यांच्या घरात चालत आलेला आहे, त्या जोडीला काश्मीरचा निसर्ग, तेथील लोकजीवन पद्मा यांनी जवळून पाहिले. त्यांच्यातील साहित्यप्रेरणा निसर्ग ही होतीच, पण त्यांचे वडील फाळणीच्या वेळी मारले गेल्यानंतरची जीवनातील पोकळी त्यांच्या कवितेने भरून काढली. त्यांचा जन्म जम्मूतील पुरमण्डलचा. जुन्या काश्मीरच्या आठवणी आजही त्यांच्या मनात ताज्या आहेत. आता त्या दिल्लीत राहत असल्या तरी त्यांचे मन काश्मीरमध्ये घुटमळते आहे. त्यांनी सुरुवातीला रेडियोवर कार्यक्रम केले. आकाशवाणीत त्यांनी डोगरी वृत्तनिवेदिका म्हणून काम केले, त्या जोडीला शिक्षण सुरू होते. त्यांनी पंजाबी, डोगरी, हिंदूी, उर्दू, काश्मिरी या भाषांवर प्रभुत्व मिळवले. त्यांचे पती सुरिंदर सिंह यांनी त्यांना तितकीच मोलाची साथ दिली. वारंवार आजारी पडणाऱ्या पद्मा यांच्यावर सगळा पैसा खर्च केला.
‘मधुकण’ या जम्मू-काश्मीर कला, संस्कृती व भाषा अकादमीच्या नियतकालिकात त्यांनी कवितालेखन केले. ‘मेरी कविता मेरे गीत’ या पद्मा यांच्या काव्यसंग्रहाला १९७१ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. ‘तवी ते झन्हा’, ‘नेहरियाँ गलियाँ’, ‘पोटा पोटा निम्बल’, ‘उत्तर बैहनी’, ‘तघियॉ’, ‘रत्तियाँ’ हे इतर काव्यसंग्रहही नंतर प्रकाशित झाले. त्यांच्या कवितांतून तरुण डोगरी मुलींच्या तरल भावना, पहाडी भागातील स्त्रियांच्या व्यथावेदना लोकगीतांचा बाज घेऊन व्यक्त होताना दिसतात. विशेष म्हणजे त्या एकदा मुंबईत आल्या असताना लता मंगेशकर यांना भेटल्या, नंतर ऋणानुबंध वाढत गेले. लतादीदींनी पद्मा यांच्या गीतांना स्वरसाज दिला, त्यामुळे आधीच गोड असलेली गीते लोकांना आणखी भावली. ‘नौशीन’, ‘मैं कहती हूँ आखन देखी’, ‘भटको नहीं धनंजय’, ‘जम्मू जो कभी शहर था’, ‘फिर क्या हुआ’, ‘गोदभरी’, ‘बुहुरा’ व ‘अब न बनेगी देहरी’, ‘बूँद बावडी’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. हिंदी अकादमी पुरस्कार, कबीर सम्मान तसेच ‘पद्मश्री’ ने त्यांना गौरवण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2016 3:07 am

Web Title: padma sachdev
Next Stories
1 विनू पालिवाल
2 जनरल (निवृत्त) जे. जे. सिंग
3 सीपी गुरनानी
Just Now!
X