गेली सुमारे पाचेक दशके आपल्या लेखणी-वाणीतून विज्ञानप्रसाराचे काम करणारे व्यासंगी अभ्यासक आणि विज्ञान लेखक प्रा. मोहन आपटे यांच्या मंगळवारी दुपारी आलेल्या निधनवार्तेने त्यांच्या माहितीप्रचुर तरी रसाळ पुस्तक/ व्याख्यानांचा आस्वादानुभव घेतलेले किमान तीन पिढय़ांतील मराठीजन हळहळले असतील. ज्ञानाच्या आणि ते इतरांना वाटण्याच्या ओढीने समर्पित जीवन जगण्याच्या आधुनिक महाराष्ट्रीय ज्ञानपरंपरेतील प्रा. मोहन आपटे हे एक होते. पदार्थविज्ञानशास्त्र हा त्यांचा मूळ अभ्यासविषय. १९३८ साली रत्नागिरीतील कुवेशीत जन्मलेल्या प्रा. आपटेंनी साठच्या दशकाच्या प्रारंभी पदार्थविज्ञानात पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि पुढील सुमारे तीन दशके त्या विषयाचे अध्यापनही केले. परंतु ज्ञानाची असीम ओढ असणाऱ्या प्रा. आपटेंसारख्या अभ्यासकाला एखाद् विषयाचे वा वर्गाच्या बंदिस्त खोल्यांचे बंधन कसे मानवणार? प्रा. आपटेंनी ही बंधने झुगारली. विज्ञानातील इतर उपशाखा असोत वा इतिहास-भूगोलासारखे विषय किंवा संगणक-तंत्रज्ञान, त्या-त्या विषयांतले मर्म जाणून ते सकळजनांना सांगण्याचे ज्ञानव्रत त्यांनी शेवटपर्यंत निष्ठेने पार पाडले. रा. स्व. संघाच्या मुशीत घडलेले प्रा. आपटे दोनेक वर्षे प्रचारक म्हणून काम करत होते आणि पुढे १९७०-७२ या काळात अभाविपचे अध्यक्षही राहिले. त्यामुळे संवाद आणि संघटनकौशल्याचे धडे त्यांनी तिथे गिरवले होतेच; या ‘कार्यकर्तेपणा’चा उपयोग त्यांना विज्ञानप्रसाराच्या कार्यात झाला. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि खगोलशास्त्रादी विज्ञाने महाराष्ट्रात रुजावीत, यासाठी त्यांनी गाडून घेऊन काम केले. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे त्यांनी अक्षरश: महाराष्ट्र पालथा घालून आपल्या खणखणीत आवाजात विज्ञानविषयक व्याख्याने दिली. आपल्या या भ्रमणात खंड पडायला नको म्हणून चालून आलेले प्राचार्यपद त्यांनी नाकारले. जे कार्य त्यांच्या व्याख्यानांमधून झाले, तेच त्यांच्या लेखनातूनही. ‘मला उत्तर हवंय!’ ही त्यांची गणित, पदार्थविज्ञान, अवकाश आदी विषयांतील प्रमुख संकल्पना, शोध समजावून देणारी पुस्तकमालिका वाचनीय आणि संग्रा ठरली. खगोलशास्त्रावरील १९ आणि गणितविषयक १५ पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले. इंटरनेट, संगणक यांच्या सुरुवातीच्या काळात त्या विषयांचाही त्यांनी वाचकांना परिचय करून दिला होता. सोप्या भाषेत विज्ञान समजावून देण्याची हातोटी जशी त्यांच्या लेखनात दिसते, तसेच त्या-त्या विषयाचा त्यांचा अभ्यासही त्यातून दिसून येतो.