भारताने पाकिस्तानशी झालेली तीनही युद्धे आतापर्यंत जिंकली. त्यात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात १९७१ मध्ये  बांगलादेश मुक्तीचे युद्ध गाजले. त्या युद्धात भारतीय नौदल, हवाई दल व भूसेना या सगळ्यांनीच नेत्रदीपक कामगिरी केली आणि पाकिस्तानी सैन्याला भारतापुढे शरणागती पत्करावी लागली. या युद्धात तत्कालीन ‘पूर्व पाकिस्तान’मधील  रहिवाशांवर  व महत्त्वाच्या ठिकाणांवर पाकिस्तानकडून सुरू असलेल्या हल्ल्यांपासून त्यांचे रक्षण करणे आणि हे हल्ले रोखून  बांगलादेशच्या महत्वाच्या ठिकाणांचे रक्षण करणे ही कामगिरी भारतातर्फे करताना हवाई दलातील वैमानिकांनी मर्दुमकी गाजवली, त्यांच्यापैकी एक म्हणजे स्क्वाडर्र्न लीडर अनिल भल्ला. त्या काळात त्यांनी मिग २१ विमानांतून भरारी घेऊन पाकिस्तानी ठिकाणांना लक्ष्य केले होते. भल्ला यांचा करोनाने मृत्यू झाला. मूळचे मुंबईचे असलेल्या भल्ला यांनी अखेरचा श्वास मात्र हैदराबाद येथे घेतला. १९८४ मध्ये ते हवाई दलातून निवृत्त झाले होते. साताऱ्याच्या सैनिकी शाळेत त्यांचे शिक्षण झाले त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून पुढील लष्करी शिक्षण पूर्ण केले. १९६८ पासून त्यांनी मिग २१ विमाने चालवण्यास सुरुवात केली. तेजपूर येथील २८ व्या स्क्वाड्रनमध्ये ते काम करीत होते. रशियन बनावटीची मिग २१ विमाने त्या काळात शस्त्रसज्जतेत महत्त्वाची होती. १९७१ च्या युद्धात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. ढाका येथील गव्हर्नर हाऊसचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्या युद्धात भारताचे सगळेच डावपेच यशस्वी झाले त्यामुळे पाकिस्तानी सैन्याला शरणागती पत्करावी लागली होती. शेवटी बांगला देशाच्या स्वातंत्र्याची मागणी मान्य होऊन, दोनच दिवसांत पाकिस्तानी प्रशासन बरखास्त झाले. त्यावेळी गव्हर्नर डॉ. मलिक व त्यांच्या प्रादेशिक मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा की चिकटून रहावे हा प्रश्न पडला तेव्हा हवाई दलानेच १४ डिसेंबर १९७१ रोजी शक्तिप्रदर्शन करून हा प्रश्न निकाली काढण्यात आला. पूर्व पाकिस्तानचे गव्हर्नर ए.एम मलिक यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचे राजीनामा पत्र अध्यक्ष याह्य खान यांना दिले.. ‘ते थरथरत्या हातांनी बॉलपेनने ते राजीनामा पत्र लिहीत होते’ याची नोंदही झाली. ही किमया भारताच्या हावाई हल्ल्याने घडवून आणली. स्क्वाड्रन लीडर भल्ला हे मास्टर ग्रीन दर्जा मिळवणारे सर्वात तरुण हवाई अधिकारी होते. हवाई दलात मोठी कामगिरी करणाऱ्यांनाच हा दर्जा दिला जातो, त्यासाठी बराच अनुभव लागतो. त्यांच्या निधनाने बांगलादेश युद्धातील  हवाई दलाच्या कामगिरीच्या आठवणींना  पुन्हा उजाळा मिळाला.