यंदा दहावीच्या गुणपत्रिकेतील गुणांची उधळण पाहून विद्यार्थी आणि पालकांना झालेल्या आनंदावर महाविद्यालयांच्या प्रवेश याद्या पाहून विरजण पडले आहे. इयत्ता अकरावीला हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी ९० टक्के गुणही कमी पडत आहेत. खूप गुण मिळाल्याचा आनंद किती क्षणिक होता, हेही लक्षात आल्यामुळे, अकरावीच्या तिसऱ्या प्रवेश यादीतही विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा आली आहे. दहावीच्या निकालात मिळालेले गुण हे आपल्या बौद्धिक क्षमतेचे खरेखुरे निदर्शक आहे, हा समज त्यामुळे आता दूर व्हावा. राज्यातील अनेक महाविद्यालयांचे प्रवेश पात्रता गुण (कट ऑफ) तिसऱ्या फेरीनंतरही अगदी ९०-९१ टक्के आहेत. परीक्षेतील गुण विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीचे दर्शन घडवतात, किमान तशीच अपेक्षा असते. परीक्षेच्या आधी दोन दिवस अभ्यास करूनही उत्तम म्हणता येतील, असे गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या मनात नवा गंड निर्माण होऊ शकतो, हे लक्षात न घेता केवळ मुलांना आणि खरेतर पालकांना खूश करण्यासाठी गुणांची ही उधळण करण्याने महाराष्ट्राच्या शैक्षणिक गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. दहावीच्या निकालातील या गुणांचे परिणाम गेली काही वर्षे दिसत असूनही अद्याप शिक्षण विभागानेही विद्यार्थ्यांना खऱ्या परिस्थितीची जाणीव करून देण्याचे मनावर घेतलेले दिसत नाही. मुलांच्या गुणपत्रिकेतील फुगलेले आकडे पाहण्यास पालकांना होणारा आनंदही दरसालची परिस्थिती पाहून ओसरलेला नाही. ‘मुलांना प्रवेश कसा मिळणार?’ असा प्रश्न पुढे करत दरवर्षी नवनव्या सवलतींची मागणी पालकांकडूनही होत असते. यंदाचे अकरावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांसाठी खरेच विश्रांतीचे वर्ष ठरल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांचे संपूर्ण वर्ष जवळपास फुकट गेले. अकरावीच्या रखडलेल्या प्रवेशांमुळे या विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षांचाही प्रश्न निर्माण होणार आहे. प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर मिळणाऱ्या कालावधीत अकरावीचा अभ्यासक्रम पूर्ण करून बारावीची तयारी विद्यार्थ्यांना सुरू करावी लागेल. पुढील शैक्षणिक वर्ष सुरळीत ठेवण्यासाठी अकरावीचे वर्ष लांबवता येणार नाही. त्यामुळे अकरावीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी जेमतेम चार ते पाच महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. विशेषत: विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी बारावीचे वर्ष अधिक आव्हानात्मक ठरते. बारावीच्या मंडळाच्या परीक्षेबरोबरच विविध प्रवेश परीक्षांची तयारी या विद्यार्थ्यांना करायची असते. त्यामुळे वर्षभराचे नियोजन करावे लागते. यंदा अकरावीच्या परीक्षा लांबल्यास पुढील वर्षांच्या बारावीच्या परीक्षेची आणि प्रवेश परीक्षांची तयारी करण्यासाठी वेळ कमी मिळेल. दहावीतून कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश केल्यानंतर पुढील आव्हानांसाठीची तयारी अकरावीच्या वर्गात होत असते. यंदा अभ्यासक्रमातील काही भाग अकरावीलाही असल्यामुळे दहावीच्या अभ्यासक्रमातून मूल्यमापनासाठी वगळण्यात आला. त्यामुळे दहावीचा वगळलेला भाग, अकरावीचा भाग आणि बारावी त्याशिवाय पुढील परीक्षांची तयारी या सगळ्याचाच भार पुढल्या एका वर्षांत विद्यार्थ्यांना पेलावा लागणार आहे. नवे विषय, नवे वातावरण याच्याशी जमवून घेण्यातच अकरावीचे वर्ष जाते. यंदा या सगळ्यासाठीही विद्यार्थ्यांना वेळ मिळणार नाही. त्यामुळे दहावीच्या परीक्षा संपल्यापासून म्हणजेच जवळपास नऊ महिन्यांनंतर आता आळस झटकून पुढील तयारीसाठी विद्यार्थ्यांना सज्ज व्हावे लागणार आहे. दहावीच्या गुणपत्रिकेतील चमकदार गुण किंवा कमी वाटणारे गुणही आपली खरी पारख करणारे नाहीत, याची जाणीव ठेवून पुढील आव्हानांसाठी तयार व्हावे लागणार आहे.