अकार्यक्षम पोलीस यंत्रणेमुळे ८४१ गुन्ह्य़ांचीच उकल

मुंबई : जानेवारी २०१४ ते मार्च २०१८ पर्यंत ४,२१२ सायबर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले असून पैकी फक्त ८४१ गुन्ह्य़ांची उकल झाली. सायबर पोलीस यंत्रणा सक्षम नसल्यामुळे अशा गुन्ह्य़ांचा छडा पूर्णपणे लागत नसल्याचे स्पष्ट होत आहे.

गेल्या चार वर्षांत क्रेडिट कार्ड क्लोनिंग करून फसवणुकीच्या १,५३२ गुन्ह्य़ांची नोंद झाली. त्यापैकी फक्त १७४ प्रकरणांची उकल झाली आहे. पाच टक्के गुन्हे वगळता इतर गुन्ह्य़ांतील पैशांची वसुलीही झाली नाही, अशी माहिती उपलब्ध आहे.

पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या सव्‍‌र्हरवर डल्ला मारून करोडो रुपये हडप केल्याप्रकरणी पुणे पोलिसांचा सायबर सेल तपास करीत असला तरी मुंबईत अशी घटना घडली तरी त्याचा छडा लावण्याइतपत मुंबई पोलिसांची सायबर पोलीस यंत्रणाही सक्षम नसल्याचेच दिसून येत आहे.

अत्याधुनिक तांत्रिक सामग्रीचा अभाव आणि तज्ज्ञ मनुष्यबळाची कमतरता हा पोलिसांचा नेहमीच कळीचा मुद्दा राहिला आहे. अशा पद्धतीतील गुन्हेगार तसेच सव्‍‌र्हर परदेशात असल्यामुळे इंटरपोलची मदत घेऊनच हा तपास केला जातो, असे मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईत सुरुवातीला एकच सायबर पोलीस ठाणे होते. आता प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर गुन्ह्य़ांचा तपास करण्यासाठी स्वतंत्र पथक आहे. तरीही मुंबई पोलिसांच्या तपासात फारशी प्रगती नाही.

 

१५३२ :   क्रेडिट कार्ड  क्लोनिंग करून फसवणूक

१७४ :    प्रकरणांची उकल

९५% :   गुन्ह्य़ांत पैशांची वसुली नाही