04 August 2020

News Flash

‘सेन्सेक्स’चा त्रिफळा!

तिमाहीसह एकूण आर्थिक वर्षांचे वित्तीय निष्कर्ष जाहीर होण्यास आठवडय़ाचा अवधी असला तरी कंपन्यांच्या घसरत्या नफ्याच्या धास्तीने गुंतवणूकदारांची मात्र आतापासूनच गाळण उडायला लागली आहे. याचे सावट

| April 5, 2013 04:25 am

तिमाहीसह एकूण आर्थिक वर्षांचे वित्तीय निष्कर्ष जाहीर होण्यास आठवडय़ाचा अवधी असला तरी कंपन्यांच्या घसरत्या नफ्याच्या धास्तीने गुंतवणूकदारांची मात्र आतापासूनच गाळण उडायला लागली आहे. याचे सावट भांडवली बाजारात उमटताना बाजार निर्देशांकाने गुरुवारी त्रिशतकी आपटी खाल्ली. मुंबई निर्देशांक- ‘सेन्सेक्स’ला यातून चार महिन्यानंतर पुन्हा १८,५०० चा आकडा पाहण्यास भाग पडले. ‘निफ्टी’नेही एकदम घसरणीची ‘सेंच्युरी’ मारल्याने राष्ट्रीय शेअर बाजार ५,६०० च्याही खाली आला आहे. सलग दुसऱ्या सत्रातील मोठय़ा निर्देशांक आपटीने गुंतवणूकदारांची पूंजी एकदम लाखभर कोटींनी रिती झाली आहे. तर सर्व १३ क्षेत्रीय निर्देशांकांनी ‘लाल’झोताखाली गेलेले दिसून आले.
सलग चार सत्रातील वाढ मोडून काढताना मुंबई निर्देशांकाने कालच्या (बुधवार) सत्रात २३९ अंशांची घसरण नोंदविली होती. तर आज सकाळच्या सत्रात घसरणीनेच व्यवहाराची सुरुवात करणारा ‘सेन्सेक्स’ अध्र्या तासात १८,६१२ पर्यंत खाली आला. काही वेळ स्थिरता राखत निर्देशांक १८,७३० पर्यंत वर गेला. हा दिवसाचा उच्चांक होता. मात्र पुन्हा त्यातील घट सुरू झाली. ती बाजाराला १८,४७७ या दिवसाच्या नीचांकार्पयंत घेऊन गेली. अखेर बाजार १८,५०० वर कसाबसा गेला आणि तिथेच स्थिरावला. ‘सेन्सेक्स’ची आजची घसरण १.५५ टक्के इतकी आहे. दोन सत्रातील घट ५३० अंशांची आहे. १८,५०० वर येताना मुंबई निर्देशांक २३ नोव्हेंबर २०१२ नंतरच्या खालच्या पातळीवर आला आहे. तर त्यापेक्षा खूप अधिक म्हणजे जवळपास पावणे दोन टक्क्यांच्या नुकसानाने ‘निफ्टी’ही ५,६०० च्या खाली आला. तांत्रिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाची म्हणजे २०० दिवसांच्या चलत सरासरीची (५६४०) नाजूक पातळी सकाळच्या घसरणीत तोडली आणि त्यापायी भयगंड पसरून विक्रीला आणखीच जोर चढत गेला.

सोने २९ हजाराखाली
सराफ बाजारात मौल्यवान धातूंची घसरणही कायम सुरू आहे. गुरुवारी सोने १० ग्रॅमसाठी २१० रुपयांनी घसरल्याने गेल्या अनेक महिन्यांनंतर ते प्रथमच २९ हजारांखाली आले. बुधवारीही सोने दर तोळ्यासाठी एकदम ३४० रुपयांनी कमी झाले होते. बुधवारी असलेला सोन्याचा २९,१९५ रुपये दर गुरुवारी २८,९८५वर आला. दरम्यान, चांदीचा दरही आता किलोसाठी ५० हजार रुपयांनजीक येऊन ठेपला आहे. कालच्या सत्रात तब्बल १,२९० रुपयांची घसरण नोंदविणारी चांदी आजच्या १३० रुपये घसरणीमुळे ५२ हजार रुपयांच्याही खाली आली आहे. रिद्धीसिद्धी बुलियन्सचे संचालक मुकेश कोठारी यांच्या मते नजीकच्या कालावधीत सोने तोळ्यामागे २७,८१० ते २५,८५० दर दाखवू शकेल.  

रुपया ५५ च्या दिशेने
डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलनातील घसरणीचा क्रम गुरुवारी रुपयाला महिन्याच्या नीचांकाला घेऊन गेला. एकाच सत्रात ४४ पैशांची घट नोंदविताना रुपयाचा प्रवास पुन्हा एकदा ५५ च्या तळाकडे सुरू झाला आहे. भांडवली बाजारातील पैसा काढून घेण्यासाठी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांना विदेशी चलनाची गरज भासल्याने त्यांनी गुरुवारी चलन व्यवहारात डॉलरची मोठय़ा प्रमाणात खरेदी केली. परिणामी आंतरबँक चलन वायदे मंचावर दिवसभरात ५४.४९ पासून ५४.८९ पर्यंत रुपया घसरला. अखेर त्याने ५५ नजीक पोहोचताना ०.८१ टक्क्यांचे नुकसान राखले. रुपयाच्या तुलनेत सशक्त होत असलेला डॉलर चालू खात्यातील तूट कमी करण्याच्या सरकारच्या प्रयत्नावर पाणी फेरत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2013 4:25 am

Web Title: bse sensex tumbles 239 points to one wk low auto telecom lead fall
Next Stories
1 श.. शेअर बाजाराचा : बीएसई तेव्हा आणि आता
2 महानगरीतील छोटय़ा घरांचा तुटवडा भरून काढण्याकडे बांधकाम विकसकांचा वाढता कल
3 दोन वर्षांपर्यंत गृहकर्जाच्या हप्त्यांपासून मोकळीक देणारे स्वमालकीचे घरकुल
Just Now!
X