* ‘एनपीसीआय’च्या अ‍ॅपमुळे अर्थव्यवस्थेत रोकडीचे प्रमाण घटणार
* चलन छपाई खर्चात मोठी बचत शक्य
अनुराग शुक्ला मुंबईत नोकरी करतात, तर त्यांचे कुटुंब उत्तर प्रदेशात गावी असते. गेल्या आठवडय़ात रात्री २ वाजता त्यांचा मोबाइल खणखणतो. वडील घरात पाय घसरून पडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले व दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्यावर शस्त्रक्रियाहोणार असल्याचा निरोप मिळतो. कुटुंबीयांना तातडीने पशाची आवश्यकता होती. अनुराग यांनी रात्रीच ‘इमिजीएट पेमेंट सíव्हस (आयएमपीएस)’ हे मोबाइल अ‍ॅप वापरून भावाच्या खात्यात पसे हस्तांतरण केले. मोबाइल फोन आणि त्यावर उपलब्ध या नव-सुविधा त्यांच्या कुटुबीयांसाठी मदतीला धावून आलेले देवावतारच ठरले..
अगदी छोटय़ा सहकारी बँकांना क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा देणे शक्य करणारे ‘रुपे कार्ड’ने आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्हिसा/मास्टरची मक्तेदारी मोडून काढली. देशात भरणा (पेमेंट) प्रणालीची प्रणेती असलेल्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ही देशातील राष्ट्रीयीकृत, खासगी व दोन परदेशी बँकांनी प्रवíतत केलेली कंपनी आहे. देशाच्या बँकिंग व्यवस्थेत तंत्रज्ञान वापरून सुप्तपणे क्रांतीच घडवून आणण्याचे काम ती करीत आहे. एनपीसीआयने प्रामुख्याने वैयक्तिक ग्राहकांसाठी ‘आयएमपीएस’ हे अ‍ॅप विकसित केले असून, देशातील कोणत्याही एका बँकेच्या खात्यातून दुसऱ्या बँकेच्या खात्यात किंवा रिझव्‍‌र्ह बँकेने मान्यता दिलेल्या प्रीपेड सेवा देणाऱ्याच्या खात्यात रोकडीचे हस्तांतरण करणे त्यामुळे सहज शक्य झाले आहे.
‘देशाच्या अर्थव्यवस्थेत १२ लाख कोटींच्या चलनाचे व्यवहार होत असतात. साहजिकच चलनी नोटांचा तुटवडा होणार नाही यासाठी अर्थव्यवस्थेत चलनाचा पुरेसा साठा असण्याची दक्षता रिझव्‍‌र्ह बँक घेत असते. चलनी नोटा छापण्याचा वर्षांचा खर्च ४०० कोटी रुपये असून, पुढील दोन वर्षांत अर्थव्यवस्थेतील रोकडीचे प्रमाण एक लाख कोटीने कमी झाले तरी वर्षांचे ५० कोटी वाचू शकतील’, असे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य परिचालन अधिकारी दिलीप आसबे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
‘जशी अर्थव्यवस्था विकसित होत जाते तसे अर्थव्यवस्थेतील चलनाचे प्रमाण कमी होते. त्यासाठी देशातील नागरिकांना चलनाच्या ऐवजी निधी हस्तांतरणासाठी सुविधा देणे आवश्यक आहे. या सुविधा विकसित करण्याचे काम देशातील बँकिंग उद्योगाच्या वतीने एनपीसीआय करीत आहे,’ असे आसबे यांनी सांगितले.
देशात लागू झालेली ‘चेक ट्रंकेशन सिस्टीम’ ही धनादेशाची वटणावळ सुलभ करणारी प्रणालीदेखील एनपीसीआयने विकसित केली आहे. ‘नॅशनल ऑटोमेटेड क्लीअिरग हाऊस’ अर्थात ‘नॅश’ ही प्रणालीदेखील एनपीसीआयने विकसित केली असून, देशातील सर्व बँकांच्या कोअर बँकिंग यंत्रणांना जोडणारी ही प्रणाली राष्ट्रीय स्तरावर सर्व इलेक्ट्रॉनिक व्यवहारांचे (ईसीएस) नियंत्रण करते.
चुटकीसरशी निधी हस्तांतरण
एनपीसीआयचे हे मोबाइल अ‍ॅप ‘पीटूपी’ म्हणजे व्यक्ती ते व्यक्ती प्रकारात मोडणारे आहे. दिवसाचे २४ तास व आठवडय़ाचे सातही दिवस ही सेवा उपलब्ध आहे. केवळ ३० सेकंदात देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला निधीचे हस्तांतरण करणे यामुळे सहज शक्य झाले आहे. यासाठी एनपीसीआयने ‘नॅशनल युनिफाइड यूएसएसडी प्लटफॉर्म’ हा मंच विकसित केला असून देशातील सर्व दूरसंचार कंपन्यांकडून *99# हा विशेष क्रमांक यासाठी घेण्यात आला आहे. कोणत्याही दूरसंचार सेवेच्या ग्राहकाकडून हा क्रमांक डायल केला असता, बँकखात्यातील शिल्लक, धनादेश पुस्तिकेची मागणी, एका खात्यातून दुसऱ्या खात्यात निधी हस्तांतरण करणे शक्य झाले आहे.