सप्ताहारंभीच आलेल्या सुट्टीनंतर खुल्या झालेल्या भांडवली बाजारांनी मंगळवारी प्रारंभापासून उत्साही वळण घेतल्याचे दिसून आले. परिणामी, सेन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशांकांनी एका व्यवहार सत्रात सांख्यिक रूपात घेतलेल्या इतिहासातील सर्वोत्तम झेप मंगळवारी नोंदविली, तर त्यांची जवळपास नऊ टक्क्य़ांची उसळी ही गत ११ वर्षांतील म्हणजे मे २००९ नंतरची सर्वोत्तम वाढ ठरली आहे.

सेन्सेक्समध्ये सामील सर्व ३० समभागांचे मूल्य दमदार वधारले. परिणामी दिवसअखेर २,४७६.२१ अंशांची उसळी घेत या निर्देशांकाने ३० हजारापल्याड ३०,०६७.२१ अंशावर विश्राम घेतला. तुलनेने व्यापक पाया असणाऱ्या ५० समभागांच्या निफ्टी निर्देशांकाने ७०८.४० अंशांची झेप घेत दिवसअखेर ८,७९२.२० अंशांची पातळी गाठली.

दोन्ही निर्देशांकांच्या मंगळवारच्या पावणे नऊ ते नऊ टक्क्य़ांच्या उसळीने गुंतवणूकदारांच्या झोळीत एका दिवसात ७.७१ लाख कोटी रुपयांची भर घालणारी किमया साधली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचे सर्व सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल  १.१६ लाख कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचले.

आशियाई बाजारात निर्देशांकांना आलेला बहर पाहता, भारतीय बाजारांची सुरुवातच सकारात्मक व्यवहारांसह झाली. जगभरात विशेषत: विकसित देशांमध्ये करोना विषाणूबाधेमुळे नवीन रुग्णांच्या नोंदीचे प्रमाण रोडावत आल्याचा बाजारावर दिसून आलेला हा परिणाम आहे, असे आनंद राठी या दलाली पेढीचे मुख्य समभाग संशोधक नरेंद्र सोळंकी यांनी सांगितले.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे करोना साथीमुळे ग्रासलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी दुसऱ्या अर्थप्रोत्साहक पॅकेजची तयारी करीत असल्याच्या चर्चेनेही बाजारातील उत्साही व्यवहारांना दुणावणारी साथ दिली. जागतिक स्तरावरील भांडवली बाजारातील उत्साही वातावरण, त्याचप्रमाणे वस्तू बाजारपेठेतील जोमदार सुधारणेचे प्रतिबिंब स्थानिक भांडवली बाजारातही उमटताना दिसले. खनिज तेलाच्या (ब्रेन्ट क्रूड) आंतरराष्ट्रीय किमती २.४८ टक्क्य़ांनी वाढून प्रति पिंप ३३.८७ डॉलरवर पोहचल्या. तसेच तेलाच्या उत्पादन आणि पुरवठय़ाबाबत तेल निर्यातदार देशांमधील वाढत्या सहमतीच्या वातावरणामुळे किमती अशाच चढय़ा राहण्याचे अंदाजही गुंतवणूकदारांना सुखावणारे ठरले. स्थानिक चलन रुपयाने अमेरिकी डॉलरपुढील शरणागतीला रोखत, मंगळवारी ४९ पैशांनी मजबुती दाखविली आणि दिवसअखेर ७५.६४ ही पातळी गाठली, याचाही भांडवली बाजारावर चांगला प्रभाव दिसून आला.

बाजार तेजी नेमकी कशामुळे?

जागतिक बाजारातील सकारात्मकता :

अमेरिकेत नवीन करोनाबाधित रुग्णांच्या वाढीचे प्रमाणात रोडावत चालले आहे, त्या परिणामी अमेरिकी भांडवली बाजारात सोमवारी तेजीचे व्यवहार झाले. वॉल स्ट्रीटवर निर्देशांक तब्बल ७ टक्क्य़ांनी वधारले. त्याचे सकारात्मक प्रतिबिंब पहाटे लवकर सुरू होणाऱ्या आशियाई बाजारातही उमटताना दिसले. त्यातच जपानच्या पंतप्रधानांनी त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या २० टक्के भरेल इतके ९९१ अब्ज अमेरिकी डॉलर खर्चाच्या अर्थप्रोत्साहक उपायांची घोषणा केल्याने, निक्केई निर्देशांक २ टक्क्य़ांनी उसळला. युरोपीय बाजारातही तेजीसह सत्राला प्रारंभ झाला.

टाळेबंदीत शिथिलता :

जागतिक स्तरावर मुख्यत: स्पेन आणि इटली या सर्वाधिक बाधित युरोपीय राष्ट्रांमध्ये तसेच भारतातही सरकारकडून करोनाच्या फैलावाला प्रतिबंध लागू केलेली टाळेबंदी अल्प जोखीम असणाऱ्या क्षेत्रातून टप्प्याटप्प्याने शिथिल केली जाण्याचे संकेत आहेत. यातून अनेक उद्योगांमधील उत्पादन आणि व्यावसायिक क्रियांमध्ये पडलेला खंड संपुष्टात येण्याची आशा आहे. पंतप्रधान मोदी यांनी सर्व मंत्र्यांना १४ एप्रिलनंतरच्या कामकाज निरंतरता योजना स्पष्ट करण्याचा आदेश देऊन, टाळेबंदीसंबंधी केलेल्या सूचक निर्देशांचा बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून आला.

औषध निर्यातबंदी रद्दबातल :

भारताने अलीकडेच करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लादलेल्या २६ प्रकारच्या औषधी आणि प्रमुख औषधी घटकांच्या (एपीआय) निर्यातबंदीपैकी २४ औषधांच्या निर्यातीवरील निर्बंध मागे घेतले आहेत. या निर्यातबंदीमुळे नाराज झालेल्या अमेरिकेबरोबर संघर्षांची शक्यताही संपुष्टात आली आहे.

विदेशातून नवीन गुंतवणुकीचा ओघ:

यंदा अर्थसंकल्पातून सूचित विदेशी गुंतवणूकदार संस्थांवरील कमाल गुंतवणुकीच्या मर्यादेतील वाढ ही नवीन आर्थिक वर्षांपासून कार्यान्वित झाली असून, भारताला त्यामुळे तब्बल १.३ अब्ज अमेरिकी डॉलर (९,९०० कोटी रुपये) आकर्षिता येतील. मार्चच्या सुरुवातीपासून तब्बल १.२५ लाख कोटी रुपयांच्या निर्गुतवणुकीने भारतीय बाजारातून काढता पाय घेत असलेली विदेशी गुंतवणूक यातून परतण्याची आशा बळावली आहे.