हाताच्या बोटावर पोटाची क्षुधा भागविण्याचा भारतीयांचा कल वाढला असून, माहिती तंत्रज्ञानाच्या व्यासपीठाद्वारे खान-पान सेवेचा लाभ घेण्यात महाराष्ट्र अव्वल ठरला आहे.
‘फूडपांडा.इन’ या ऑनलाइन अन्नपुरवठा सेवेने केलेल्या सर्वेक्षणात अन्नाबाबतचा दर्जा राखण्याला मोबाइलधारक प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे. कंपनीने अलीकडेच महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आदी मोठय़ा शहरांमध्ये याबाबतचे सर्वेक्षण केले. यातून या मोठय़ा शहरातील खाद्यान्न मागविण्याच्या प्राधान्यांचा अभ्यासही केला गेला. स्मार्टफोनच्या वाढत्या वापराचे प्रतििबबही यातून दिसले.
महाराष्ट्रातील ग्राहकांनी आपले जेवण फूडपांडा.इनच्या मोबाइल अ‍ॅपद्वारे मागविल्याचे दिसून आले आहे. या माध्यमातून नोंदविण्यात आलेल्या मागण्यांची संख्या गेल्या वर्षभरात चौपटीने वाढली असून त्यातून जेवण मागवण्याची वेळ येते तेव्हा मोबाइल अ‍ॅपची सोय आणि सुविधा यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
या सर्वेक्षणानुसार, अनेक ग्राहक ‘कॅश ऑन डिलिव्हरी’चा पर्याय निवडण्यावर भर देतात, असेही दिसून आले आहे. पसे देण्यापूर्वी त्यांची मागणी आणि अन्नाचा दर्जा तपासता येतो, हा त्यासाठी प्राधान्य असल्याचे मत नोंदविण्यात आले. ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ मागणीची संख्या ६९ टक्के होती, तर ‘ऑनलाइन पेमेंट’चा वापर केलेल्या अन्न मागणीची संख्या ३१ टक्के होती. महाराष्ट्रात दुपारी १२ ते २ व रात्री ८ ते ९ या वेळेत अन्नपुरवठय़ाची मागणी अधिक नोंदविली जाते, असेही हे सर्वेक्षण सांगते.
मुंबईत नोकरदार, तर पुण्यात विद्यार्थी वर्गाकडून अशा प्रकारच्या मागणीची नोंद अधिक होते, असे याबाबत फूडपांडा.इनचे व्यवस्थापकीय संचालक व सहसंस्थापक रोहित चढ्ढा यांनी सांगितले. विविध प्रकारचे फास्ट फूडची मागणी नोंदविणाऱ्यांपैकी रॅप्स या खाद्यपदार्थाचा क्रम सर्वात वरचा, तर त्यापाठोपाठ पिझ्झा आणि बिर्याणी यांचा क्रमांक असल्याचेही ते म्हणाले. चायनीज जेवणाच्या नोंदणीचे प्रमाण ११ टक्के होते, तर इटालियन पदार्थाची मागणीही अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले.
फूडपांडा.इन भारतात सध्या ३० शहरांमधील ३,५०० हॉटेलांच्या सहकार्याने ही सेवा पुरवीत असून, मागणी नोंदविणाऱ्यांना रेस्टॉरन्ट तसेच मेनूची निवड करण्याची संधी यात आहे.