१ ऑक्टोबरपासून अंमलबजावणीचे बँकांना आदेश * गृह, वाहन कर्जदारांना ऐन सणांच्या तोंडावर स्वस्त कर्जाची भेट

व्यापार प्रतिनिधी, मुंबई</strong>

प्रमुख व्याजदरात वेळोवेळी कपात होऊनही त्याचा लाभ प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात आखडता हात घेणाऱ्या व्यापारी बँकांवर अखेर रिझव्‍‌र्ह बँकेने सक्तीचा बडगा उगारला आहे. व्यापारी बँकांनी त्यांचे कर्ज व्याजदर १ ऑक्टोबरपासून रिझव्‍‌र्ह बँकेच्या रेपो दराशी संलंग्न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे गृह, वाहन कर्जदार तसेच लघूउद्योगांना स्वस्तातील कर्जे उपलब्ध होणार आहेत.

रिझव्‍‌र्ह बँक तिचा रेपो दर अनेकदा कमी करूनही व्यापारी बँका मात्र त्या प्रमाणात कर्ज व्याजदर कमी करत नाही, अशी खंत खुद्द गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यापूर्वी अनेकदा व्यक्त केली आहे. आता दर तिमाहीत एकदा बँकांना दर बदलता येणार आहेत.

चालू वर्षांत रिझव्‍‌र्ह बँकेने १.१० टक्के रेपो दर कमी करूनही व्यापारी बँकांनी मात्र तुलनेत केवळ ०.४० टक्के दर कपातच केली आहे. स्टेट बँकसारख्या निवडक काही बँकांनीच आतापर्यंत रेपो दराशी निगडित कर्ज व्याजदर सुविधा दिली आहे.

व्यापारी बँकांनी येत्या १ ऑक्टोबरपासून त्यांचे नवे बदलते (फ्लोटिंग) गृहादी कर्ज व्याजदर हे रिझव्‍‌र्ह बँकेच्या रेपो दरांशी निगडित ठेवावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. वाहन, लघू उद्योगांसाठीही अशी रेपो दर संलंग्न व्याजदर उत्पादने असावीत, असेही मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे. यामुळे रिझव्‍‌र्ह बँकेच्या रेपो दर बदलाचा थेट व त्वरित लाभ कर्जदारांना होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे महिन्यात येऊ घातलेल्या दसऱ्याच्या (८ ऑक्टोबर) तोंडावर या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याने सण-समारंभाची भेट कर्जदारांना मिळणार आहे. ऑक्टोबरच्या अखेरिस दिवाळी आहे.

रेपो दराशी निगडित तसेच रिझव्‍‌र्ह बँकेच्या ‘एमसीएलआर’शी संलंग्न व्यापारी बँका त्यांचे कर्ज व्याजदर निश्चित करतात. तसेच सध्या आधार (बेस) दर, ‘बीपीएलआर’ आदी संज्ञा बँकांमध्ये रुढ आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेने निश्चित केलेल्या रेपो दरापेक्षा पुढे हे दर असतात. बँका या दरांपेक्षा कमी प्रमाणात कर्ज व्याजदर आकारात नाहीत अथवा ठेवींवरही या प्रमाणापेक्षी कमी व्याज देत नाहीत. यापूर्वी, १ एप्रिलपासून बँकांनी रेपो संलंग्न दर करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. आता त्याची सक्ती करण्यात येत आहे.

मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी केंद्र सरकारच्या स्तरावर विविध उपाययोजना होत असतानाच रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी याबाबत आदेश काढत ग्राहकांकडून कर्ज मागणीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. बँकांकडे पुरेसे आर्थिक पाठबळ असूनही कर्जासाठीची मागणी रोडावल्याने अर्थगती मंदावली आहे. त्यातच गैर बँकिंग वित्त कंपन्या आणि देशातील वाहन क्षेत्रही ग्राहकांकडून नसलेल्या मागणीने होरपळून गेले आहे.

स्टेट बँक              ८.०५%

बँक ऑफ बडोदा  ८.३५%

आयसीआय. बँक ८.५५%

अ‍ॅक्सिस बँक    ८.५५%

एचडीएफसी बँक  ८.६०%

(निवडक बँकांचे रेपो संलंग्न दर)

आयसीआयसीआय बँकेच्या व्याजदरात कपात

आयसीआयसीआय बँकेने कर्जावरील व्याजदरात कपात जाहीर केली आहे. बँकेने कर्जावरील व्याजासह ठेवींवरील व्याजदरही ०.१० टक्के प्रमाणात कमी केले आहेत. बँकेचे सर्व कालावधीसाठीचे व्याजदर आता ‘एमसीएलआर’शी निगडित करण्यात आले आहेत. नवे दर १ सप्टेंबरपासूनच लागू होत आहेत. बँकेने एप्रिल २०१९ पासून ०.२० टक्केपर्यंत व्याजदरात कपात केली आहे.