करोना साथीच्या उद्रेकाचे भारताच्या अर्थव्यवस्थेवरील परिणामांचे पहिला दृश्य संकेत देणारी आकडेवारी पुढे आली असून, मार्च महिन्याचे वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलन हे मागील पाच महिन्यांच्या नीचांक गाठणारे, तर वाहन विक्री गेल्या वर्षीच्या मार्चच्या आकडेवारीच्या तुलनेत निम्मे प्रमाणही गाठू शकली नसल्याचे दिसून आले आहे.

करोना विषाणूजन्य साथीला प्रतिबंध म्हणून २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून देशव्यापी टाळेबंदी लागू करण्यात आली. पण करोना साथीच्या धसक्याने एकंदर ग्राहक व खरेदीदारांच्या भावनांना ग्रासले असल्याचे मार्च महिन्यात झालेल्या ९७,५९७ कोटी रुपयांच्या जीएसटी संकलनाने दाखवून दिले. गेल्या वर्षीच्या मार्चमधील संकलनाच्या तुलनेत ते ८ टक्क्यांनी घटले असून, आधीच्या पाच महिन्यांच्या तुलनेतही ते अल्पतम आहे. परिणामी, संपूर्ण २०१९-२० आर्थिक वर्षांसाठी जीएसटी संकलन हे १२,२२,१३१ कोटी रुपये झाले आहे. २०१८-१९ मधील ११,७७,३६९ कोटी रुपयांच्या कर संकलनाच्या तुलनेत ते ३.८ टक्के अधिक असले, तरी सरकारकडून अंदाजित लक्ष्याच्या तुलनेत खूपच कमी आहे.

सर्वच वाहन विक्रेत्यांनी नवीन आर्थिक वर्षांपासून कालबाह्य़ ठरत असलेल्या ‘बीएस ४’ या जुन्या प्रदूषण मानकावर आधारित वाहनांच्या विक्रीसाठी सवलती व विशेष योजना आणल्या होत्या. अनेकांकडून दुचाकींवर १५ ते २० हजार रुपयांपर्यंत, तर कारवर अगदी दीड लाख रुपयांपर्यंत सूट देणाऱ्या योजना असतानाही, मार्चमधील विक्रीतील मोठी तूट अधिकच गंभीर आहे.

आधीच विक्री मंदावलेल्या वाहन उद्योगाला करोना वाढत्या फैलावाने आणखीच दणका दिला आहे. देशातील वाहन विक्रीत सर्वाधिक हिस्सा असणाऱ्या मारुती सुझुकीला गेल्या वर्षी मार्च महिन्यात झालेल्या विक्रीच्या तुलनेत तब्बल ५१ टक्क्यांची घट यंदा सोसावी लागली आहे. तर प्रामुख्याने वाणिज्य वाहन विक्रीत आघाडीचे स्थान असलेल्या टाटा मोटर्सच्या विक्रीतील घसरण तब्बल ८७ टक्के इतकी आहे. ह्य़ुंडाई मोटरच्या कार विक्रीतील घट ४७ टक्के, तर एसयूव्ही प्रकारातील वाहनांत अग्रस्थान असलेल्या महिंद्र अँड महिंद्रला विक्रीत मार्च २०१९ च्या तुलनेत ८८ टक्क्यांची तूट सोसावी लागली आहे. दुचाकी निर्मात्या टीव्हीएस मोटर कंपनीने मार्चमधील विक्री ५५.५ टक्के तुटीसह १,४४,७३९ इतकी असल्याचे नोंदविली आहे.

वाहन विक्री मार्चमध्ये निम्म्यावर

निर्मिती क्षेत्र निर्देशांकाला विक्रमी घरघर

नवी दिल्ली : देशातील निर्मिती उद्योगातील क्रियाकलाप कमालीचे मंदावल्याचे आणि सरलेल्या मार्चमध्ये त्यांनी आधीच्या चार महिन्यांतील नीचांकाला गाठल्याचे अधिकृत सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

आयएचएस मार्किट इंडियाकडून निर्मिती क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांमध्ये केल्या गेलेल्या सर्वेक्षणावर आधारित ‘पीएमआय’ मार्चमध्ये ५१.८ गुणांवर घसरला आहे, जो नोव्हेंबर २०१९ नंतरचा सर्वात अल्पतम स्तर आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये पीएमआय ५४.५ गुणांवर होता. नव्या व्यवसायांच्या वाढीची मंदगती तसेच करोनाच्या जागतिक उद्रेकामुळे फेब्रुवारीच्या अखेरपासूनच आंतरराष्ट्रीय स्तरावरून रोडावलेल्या मागणीचे प्रतिबिंब मार्च महिन्याच्या आकडेवारीत उमटले आहे.

तथापि, सलग ३२ व्या महिन्यांत देशाच्या निर्मिती क्षेत्राचा पीएमआय ५० गुणांपेक्षा सरस राहिला आहे. हा निर्देशांक ५० गुणांच्या पुढे नोंदविला जाण्यातून विस्तार प्रगतिपथावर असल्याचे निदर्शक मानला जातो. तो ५० गुणांच्या खाली जाणे कुंठितावस्था दर्शविते. मात्र सध्या करोनाचा उद्रेक रोखण्यासाठी सुरू असलेली टाळेबंदी पाहता एप्रिलची आकडेवारी अधिक नकारात्मक राहू शकते.