स्पर्धा आयोगाला उत्तर देण्याची अमेरिकी कंपनीची तयारी

पीटीआय, नवी दिल्ली

फ्यूचर समूहाने दाखल केलेल्या तक्रारीनंतर भारतीय स्पर्धा आयोगाने अमेरिकी ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनला नोटीस धाम्ली आहे. रिलायन्स विरोधातील कायदेशीर लढाईत उतरलेल्या अ‍ॅमेझॉनने मात्र या नोटीशीला सामोरे जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

किशोर बियाणी प्रवर्तित फ्यूचर समूहातील किरकोळ विक्री व्यवसाय मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने २४,७१३ कोटी रुपयांच्या मोबदल्यात गेल्या वर्षी खरेदी केला होता. याला फ्यूचरबरोबर व्यावसायिक भागीदारी असलेल्या अमेरिकेतील आघाडीच्या अ‍ॅमेझॉन या ई-कॉमर्स मंचाने आक्षेप घेतला.

या संबंधाने सुरू असलेल्या कायदेशीर लढाईतच फ्यूचर समूहाने भारतीय स्पर्धा आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यानुसार आयोगाने अ‍ॅमेझॉनला नोटीस पाठवली असून त्यावर उत्तर देण्यास सांगितले आहे. फ्यूचर समूहाकडून मात्र नेमक्या आरोपाचे अधिकृतपणे कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

त्या उलट कायदेशीर बाबी तपासून पाहून योग्य ते उत्तर दिले जाईल, असे अ‍ॅमेझॉनने गुरुवारी स्पष्ट केले. ‘भारतीय स्पर्धा आयोगाच्या शंकांचे निरसन होईल, या दृष्टीने सर्व सहकार्य करत आहोत,’असेही अ‍ॅमेझॉनमार्फत नमूद करण्यात आले.

व्यावसायिक खरेदी – विक्री व्यवहाराबाबतची दाद भारतीय स्पर्धा आयोगाकडे मागण्याची यंत्रणा भारतात आहे. यानुसार सर्वप्रथम अ‍ॅमेझॉनने आंतरराष्ट्रीय स्तरावर फ्यूचर विरोधात आक्षेप घेतल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी आयोगापुढे सुरू झाली.

ऑक्टोबर २०२० मध्ये रिलायन्सने फ्यूचरचा किराणा व्यवसाय खरेदी करण्याबाबत करार केला. मात्र अ‍ॅमेझॉनच्या आक्षेपानंतर त्याची कायदेशीर पूर्तता अद्याप होऊ शकली नाही. अ‍ॅमेझॉनने ऑगस्ट २०१९ मध्ये  फ्युचर कूपन्समधील ९ टक्के हिस्सा खरेदी  केला आणि उर्वरित हिस्सा १० वर्षांत खरेदी करण्याचे प्रथम हक्कही अ‍ॅमेझॉनकडे होते. रिलायन्स – फ्युचर व्यवहार मार्च २०२१ अखेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असताना त्याबाबत आणखी सहा महिन्यांची मुदत रिलायन्सने मागून घेतली आहे.