11 August 2020

News Flash

धीर सुटला!

अर्थ सुधारणेला चालना देऊ पाहणारी विधेयके संसदेत पारित होण्यासाठी रेंगाळत असलेले पाहून गुंतवणूकदारांचा मंगळवारी धीर सुटला.

| May 13, 2015 06:33 am

अर्थ सुधारणेला चालना देऊ पाहणारी विधेयके संसदेत पारित होण्यासाठी रेंगाळत असलेले पाहून गुंतवणूकदारांचा मंगळवारी धीर सुटला. एकाच व्यवहारात तब्बल ६३० अंशांची आपटी नोंदवित सेन्सेक्सला अखेर २७ हजाराखाली तळ गाठावा लागला.
दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये तब्बल २ टक्क्य़ांहून अधिक आपटी नोंदली गेली. गेल्याच आठवडय़ात सेन्सेक्स व निफ्टीने जवळपास दोन टक्क्य़ांच्या आतील घसरण नोंदविली आहे. निफ्टीही आता ८,२०० चा स्तर सोडता झाला आहे. मोठय़ा घसरणीमुळे मुंबईच्या शेअर बाजारात गुंतवणूकदारांची मालमत्ताही एकाच व्यवहारात २ लाख कोटी रुपयांनी रोडावली.
विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांवरील किमान पर्यायी कर (मॅट) बाबत सरकार स्तरावर दिलासा मिळत असताना मुंबई शेअर बाजारात दोन व्यवहारात तब्बल ९०८ अंश भर पडली होती. या करावरूनच यापूर्वी एप्रिल महिन्यात बाजाराने सततची मोठी घसरण अनुभवली होती.
वस्तू व सेवा करसह जमीन हस्तांतरण विधेयक सध्या राज्यसभेत प्रतिक्षित आहे. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात सरकारकडे बहुमत कमी असल्याने ही विधेयके मंजूर होण्यात अडथळा येण्याची भीती गुंतवणूकदारांमध्ये एकवटल्याने सेन्सेक्ससह निफ्टीमध्ये आठवडय़ातील दुसऱ्या सत्रात मोठी निर्देशांक घसरण नोंदली गेली.
आठवडय़ातील दुसऱ्या सत्रात परकी चलन व्यासपीठावर डॉलरच्या तुलनेत रुपयानेही ६४ ला पुन्हा पार केल्यानेही बाजाराच्या चिंतेत अधिक भर पडली. सत्रात चलन ३४ पैशांनी घसरले होते. असे करताना ते ६४.२० पर्यंत आपटले. रुपयाने गेल्या आठवडाअखेरही डॉलरसमोर ६४ पर्यंत नांगी टाकली होती.
दिवसअखेर जारी होणाऱ्या एप्रिलमधील महागाई दर व मार्चमधील औद्योगिक उत्पादन दराबाबतही बाजारात चिंता व्यक्त केली गेली. आणि या साऱ्याला जोड आंतरराष्ट्रीय प्रमुख रोखे बाजारातील अस्वस्थतताही कारणीभूत ठरली.
व्यवहारात २७ हजाराचा टप्पा सोडणारा सेन्सेक्स दिवसभरात २६.८३७.३९ पर्यंत उतरला. तर निफ्टीचा मंगळवारचा प्रवास ८,३२६.६५ ते ८,११५.३० दरम्यान राहिला. दिवसअखेर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकात जवळपास द्विशतकी निर्देशांक घसरण झाली. निफ्टीने गेल्या दोन व्यवहारात २६८ अंश भर राखली आहे.
सेन्सेक्समधील केवळ डॉ. रेड्डीज् व हीरो मोटोकॉर्प वगळता इतर सर्व २८ समभाग घसरले. घसरणीत टाटा समूहातील टाटा स्टील सर्वाधिक ६.२९ टक्क्य़ांनी घसरला. पाठोपाठ भेल, वेदांता, आयसीआयसीआय बँक, टाटा पॉवर, लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो, अ‍ॅक्सिस बँक, हिंदाल्को यांचा क्रम राहिला. मिड व स्मॉल कॅप निर्देशांकही प्रत्येकी १.७ टक्क्य़ांनी घसरले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ३.३० टक्क्य़ांसह स्थावर मालमत्ता निर्देशांक सर्वाधिक नुकसान सोसणारा ठरला.
बाजारात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमुख देशांच्या सरकारी रोख्यांचे व्याज् कमी होत असल्याच्या चित्राचे परिणामही जाणवले. यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय भांडवली बाजारातही मंगळवार दुपापर्यंत पडझड नोंदली गेली. येत्या महिन्यात रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर कपात अपेक्षित असतानाच त्याच व्याजदरावर आंतरराष्ट्रीय हालचाल पहायला मिळाली.

गुंतवणूकदारांनी २ लाख गमावले
६३० अंश आपटीने मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी २ लाख कोटी रुपये गमाविले. सूचिबद्ध कंपन्यांची मालमत्ता २,०४,७२४.६२ कोटी रुपयांनी कमी होत ९९,०५,२४३ कोटी रुपयांवर आली. सेन्सेक्सच्या २७ हजाराखाली येण्याने मुंबई शेअर बाजाराची मालमत्ताही १०० लाख कोटी रुपयांपासून दुरावली.

सोने – चांदीत दर चढाव
सराफा बाजारात मौल्यवान धातूमध्ये अचानक दरांची चमक दिसून आली. तोळ्यासाठी सोन्याचा दर २५० रुपयांनी उंचावत २७ हजार पार गेला. सोने १० गॅमसाठी २७,१४५ रुपयांपर्यंत झेपावले. याचबरोबर चांदीलाही किलोसाठी मंगळवारी ४०० रुपये अधिक मूल्य मिळत पांढऱ्या धातूचा भाव ३८,५०० रुपयांपर्यंत जाऊन भिडला.

रुपया पुन्हा ६४ च्या तळात
डॉलरच्या तुलनेत रुपया मंगळवारी पुन्हा ६४ च्या तळात विसावला. सोमवारच्या तुलनेत ३२ पैशांनी आपटत रुपया ६४.१७ पर्यंत घसरला. चलनाने यापूर्वीच्या सलग दोन व्यवहारात तेजी नोंदविली होती. तर गेल्या आठवडय़ातही रुपया ६४ पर्यंत घसरला होता. मंगळवारचा त्याचा प्रवास ६४.२६ पर्यंत घसरला. दिवसभरात ६४ च्या खाली, ६४.१० पर्यंतच तो मजल मारु शकला. बाजारातून गुंतवणूकदारांचा मंगळवारी काढता पाय राहिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2015 6:33 am

Web Title: why sensex closed 630 points lower today
Next Stories
1 २५,००० कोटींचा पल्ला अमूल गाठणार
2 भूविकास बँकांना अखेर टाळे!
3 आदित्य बिर्ला समूहाचा पुन्हा रिटेल विस्तार
Just Now!
X