महाराष्ट्र ही संधींची भूमी असून त्याचा अमेरिकेतील गुंतवणूकदारांनी लाभ घ्यावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले. आमच्याकडे लालफितीचा कारभार नाही; उलट आम्ही तुमचे पायघडय़ा घालून स्वागतच करू, असे त्यांनी इंडिया बिझीनेस कौन्सिलच्या बैठकीत स्पष्ट केले.
सध्या अमेरिका दौऱ्यावर असलेल्या फडणवीस यांनी पायाभूत सुविधा, उत्पादन, कृषी प्रक्रिया या क्षेत्रात गुंतवणुकीचे आवाहन केले आहे. आपण गुंतवणूकदार, राजकीय नेते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांची भेट घेऊन गुंतवणुकीबरोबरच तज्ज्ञ व्यक्तींना भारतात येण्यास सांगितल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्रात गुंतवणुकीस हीच योग्य वेळ असून अमेरिकी लोकांना मोठी संधी आहे, तुम्ही एकदा यायचे ठरवले की आम्ही तुमच्यासाठी सगळे काही करू, आमचे सरकार लालफितीचे नसून गुंतवणुकीचे स्वागत करणारे आहे असे त्यांनी इंडिया बिझीनेस कौन्सिलच्या बैठकीत सांगितले.
महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांना मार्गदर्शन, सुविधा व भागीदारी दिली जाईल, त्यातून चांगले मनुष्यबळ तयार होईल व चांगल्या संस्थाही निर्माण होतील. आमच्या सरकारने उद्योगानुकूल धोरण स्वीकारले असून परवान्यांची संख्या कमी केली आहे. एक खिडकी योजना आम्ही सुरू करीत आहोत, परवाने एकाच ठिकाणी संगणकीकृत मार्गाने दिले जातील. आम्हाला महाराष्ट्राचे नाव गुंतवणुकीत जगात पुढे आणायचे आहे, त्यामुळे उत्पादन, शहर विकास, कृषी प्रक्रिया उद्योगात अमेरिकी गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावे. मुंबईजवळ स्मार्ट शहरे उभी केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. नागरीकरण हे आव्हान नसून संधी आहे. बंदरे, विमानतळे, रेल्वे, रस्ते व वीज उत्पादन यात राज्यामध्ये गुंतवणूक येत आहे. दिल्ली-मुंबई मार्ग, स्मार्ट शहरे यासाठी आम्ही संयुक्त प्रकल्पांचा मार्ग अवलंबणार आहोत, त्यामुळे मेक इन इंडिया व मेक इन महाराष्ट्र या दोन्ही योजनांना गती मिळेल. महाराष्ट्रात वीज भरपूर आहे, त्यामुळे भारनियमन कमी आहे. विजेचे दर उद्योगांसाठी १ रूपया ३८ पैशांनी कमी केले आहेत, त्यात अनुदानाचा वापर केलेला नाही. मूल्य साखळी योजनेत पाच लाख शेतकऱ्यांना सहभागी केले असून पुढील वर्षी २५ लाख शेतकऱ्यांना सहभागी केले जाईल. फडणवीस आठ दिवसांच्या दौऱ्यात डेट्रॉईट, सॅनफ्रान्सिस्को, लॉसएंजल्स या शहरांना भेटी देणार आहेत. ‘मुंबई मीटस मॅनहटन’ हा त्यांच्या दौऱ्याचा केंद्रबिंदू आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jul 2015 रोजी प्रकाशित
अमेरिकी गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र ही संधींची भूमी: फडणवीस
महाराष्ट्र ही संधींची भूमी असून त्याचा अमेरिकेतील गुंतवणूकदारांनी लाभ घ्यावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले.

First published on: 01-07-2015 at 06:44 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra is opportunity land for american investors says devendra fadnavis