|| वसंत माधव कुळकर्णी

मागील आठवडय़ात कोटक महिंद्र बँकेने भांडवली मूल्यात देशाच्या सर्वाधिक शाखा असलेल्या स्टेट बँकेला मागे टाकले. बँकिंग क्षेत्रात कोटक बँक ही एचडीएफसी बँकेनंतर दुसऱ्या क्रमांकाचे भांडवली मूल्य असलेली बँक ठरली आहे. चार-पाच वर्षांपूर्वी बँकिंग उद्योगात मिड कॅप समजला जाणाऱ्या कोटक महिंद्र बँकेसारखी भांडवली मूल्यात वाढ अनेक दर्जेदार मिड कॅप समभागांमध्येही दिसून आली आहे. मागील पाच वर्षांत मिड कॅप फंडाची कामगिरी लार्ज कॅप किंवा डायव्हर्सिफाइड फंडांतील गुंतवणुकीवरील परतावा मिड कॅप फंडातील गुंतवणुकीवरील परताव्यापेक्षा अधिक आहे. मिड कॅप फंड गटातील पाच वर्षांच्या गुंतवणुकीचा विचार केल्यास केवळ ४२ टक्के मिड कॅप फंडांनी आपापल्या संदर्भ निर्देशांकांपेक्षा सरस कामगिरी केली आहे. पाच वर्षांच्या चलत सरसरीच्या आकडेवारीत ९८ टक्के वेळा एल अँड टी मिड कॅप फंडाने संदर्भ निर्देशांकापेक्षा सरस कामगिरी केली आहे. ‘निफ्टी मिड कॅप १०० टीआरआय’ हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे. एखाद्या समभागाची निवड गुंतवणुकीसाठी करताना त्या समभागाचे भांडवली मूल्य या निर्देशांकातील समभागांच्या किमान आणि कमाल भांडवली मूल्यांच्या दरम्यान असणे आवश्यक असते.

एल अँड टी मिड कॅप फंडाचे समभागांच्या गुंतवणुकीसाठी ‘७०:३०’ धोरण आहे. फंडाच्या ७० टक्के गुंतवणुका दीर्घकालीन परंतु गुंतवणूक करताना उचित भांडवली मूल्य असलेल्या असतात. तर ३० टक्के गुंतवणुका समभागांचे मूल्य गुंतवणूक करतेवेळी त्यांच्या अंतर्निहित किमतीपेक्षा खूपच कमी असलेल्या असतात. गुंतवणुकीच्या ७० टक्के भाग असलेल्या कंपन्यांत मुख्यत्वे तीन प्रकारच्या कंपन्यांचा समावेश होतो. पहिल्या प्रकारात, वितरणाचे जाळे असलेल्या ग्राहकाभिमुख कंपन्या, नामामुद्रांकित उत्पादने,  विशिष्ट उत्पादनाचे पेटंट असलेल्या कंपन्यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ, बर्जर पेंट्स, थरमॅक्स, कजारिया सिरॅमिक्स, वोखार्ट्स इत्यादी. दुसऱ्या प्रकारात, व्यवसाय विस्ताराच्या संधी असलेल्या (पाच वर्षांत विक्री दुप्पट, तिप्पट करू शकणाऱ्या जसे, सुंदरम फास्टनर्स, एमआरएफ, टीव्हीएस श्रीचक्र टायर्स, क्रिसिल.) तिसऱ्या प्रकारात गुंतवणूक करतेवेळी अत्यंत आकर्षक मूल्यांकन असलेल्या कंपन्या, यात प्रामुख्याने नव्याने समावेश करण्यात आलेल्या कंपन्या उदारणार्थ, कॅस्ट्रॉल इंडिया, सिटी युनियन बँक. ३० टक्के गुंतवणूक असलेल्या समभागांच्या गटात अंतर्निहित किमतीपेक्षा खूपच कमी बाजारभाव असलेल्या कंपन्यांचा समावेश होतो. या फंडाला गुंतवणुकीसाठी कुठलेही उद्योग क्षेत्र वज्र्य नाही. अर्थचक्राच्या दिशा बदलानुसार आकर्षक वाटणाऱ्या उद्योग क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश योग्य वेळी गुंतवणुकीत होत असतो. सध्या संदर्भ निर्देशांकापेक्षा सरकारी बँकांतील प्रमाण कमी तर जिन्नस विशेषत: सिमेंट कंपन्यांत अधिक गुंतवणूक केली आहे. व्यवसाय करण्याच्या पद्धतीबाबत तसेच व्यावसायिक धोरणांच्या आदर्श प्रथांचे पालन न करणाऱ्या कंपन्या निधी व्यवस्थापकांनी टाळल्या आहेत. या फंडाचे सौमेंद्रनाथ लाहिरी निधी व्यवस्थापक, तर विहंग नायक सह-निधी व्यवस्थापक आहेत.

नव्याने गुंतवणूक करण्यासाठी मिड कॅप आकर्षक नाहीत असे मानणारा गुंतवणूक सल्लागारांचा एक वर्ग आहे. मिड कॅप निर्देशांकाचे मूल्यांकन धडकी भरविणारे असले तरी अनेक निर्देशांकाबाहेरील कंपन्या आकर्षक मूल्यांकनाला उपलब्ध आहेत. नेमक्या या कंपनी हुडकून त्यांचा समावेश गुंतवणुकीत करण्यात एल अँड टी फंड घराण्याचे मुख्य गुंतवणूक अधिकारी (समभाग) सौमेंद्रनाथ लाहिरी हे माहीर आहेत. एल अँड टी फंड घराण्याच्या अपवाद वगळता बहुतेक योजना क्रिसिल रँकिंगमध्ये टॉप‘क्वारटाइल’मध्ये स्थान अबाधित राखून आहेत. हा फंड ३, ५, १० आणि १२ वर्षे कालावधीतील परताव्याच्या निकषावर या फंडाचा समावेश पहिल्या पाचात झालेला आहे. सर्व कालावधीत पहिल्या पाचात असलेला हा एकमेव फंड असणे हे या फंडाची शिफारस करण्याचे कारण आहे. संदर्भ निर्देशांकापेक्षा अधिक परतावा दिलेल्या सर्वच मिड कॅप फंडाची मागील कालावधीतील कामगिरी अपवादात्मक असल्याने मागील परताव्याचा दर पाहून मिड कॅप फंडात गुंतवणूक करण्याचा निर्णय न घेता १० वर्षांत मिड कॅप फंड गुंतवणूकदाराच्या पदरात परताव्याचे घसघशीत माप टाकतात हे लक्षात घेऊन आपल्या जोखमांकानुसार ‘एसआयपी’ पद्धतीने योग्य त्या प्रमाणात मिड कॅप फंडाचा समावेश करावा.

shreeyachebaba@gmail.com

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)