प्यारे खान..शिक्षण जेमतेम बारावी. वडिलांच्या उत्पन्नात भागत नसल्याने त्यांनी ऑटोरिक्षाचा पर्याय स्वीकारला. परंतु ऑटोरिक्षा हे उदरनिर्वाहाचे केवळ साधन आहे साध्य नाही, अशी खूणगाठ मनाशी पक्की होती. एकुणात मार्ग स्पष्ट होता, पण दिशा सापडलेली नव्हती. प्रतिकूलतेचे लाख अडथळे समोर आ वासून उभे होते. परंतु, निर्धार पक्का होता. याच निर्धाराच्या बळावर प्यारे खान यांनी फक्त १२ हजारांच्या भांडवलाच्या आधारे तब्बल ४०० कोटींचे व्यावसायिक साम्राज्य उभारले. त्याचीच ही यशोगाथा..

व्यवसायात प्रगती व्हावी आणि यश मिळावे असे प्रत्येक व्यावसायिकाला वाटत असते. मात्र यश प्रत्येकाच्याच वाटय़ाला येईल याची खात्री नसते. त्यातल्या त्यात जर व्यवसाय हा वाहतुकीशी निगडित असेल तर सतराशे साठ व्यत्यय ठरलेलेच. तरी त्याची तमा न बाळगता प्रामाणिकपणा आणि वेळेच्या योग्य नियोजनाच्या बळावर एका पाठोपाठ एक यशाच्या पायऱ्या चढत नागपूरचे मालवाहतूकदार प्यारे खान यांनी अल्पावधीतच या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पूर्वी रिक्षाचालक असलेले प्यारे खान यांनी दहा वर्षांत नव्हत्याचे होते करून दाखविले आणि २५० ट्रेलर-ट्रक आपल्या अंगणात उभे केले.

मालवाहतूक व्यवसाय तसा जोखमीचा. अर्ध्या रात्री झोपेतून उठून धावावे लागते. कधी ट्रकचा अपघात होतो तर कुठे वाहतूक पोलिसांची अडवणूक. त्यासोबतच माल वेळेत पोहोचविण्याचे मोठे आव्हान समोर असतेच. अशात प्यारे खान यांनी या सर्व बाबींवर मात करत सर्व आव्हाने यशस्वीरीत्या पेलली. यामध्ये सर्वात महत्त्वाचे ठरले ते वेळेचे व्यवस्थापन. आज ग्राहक वेळेत सेवा देणाऱ्याला प्राधान्य देतात. दिलेल्या शब्दाप्रमाणे वेळेत सेवा दिली तर तो ग्राहक इतर पर्यायाचा विचार करत नाही हे समीकरण प्यारे खान यांना चांगले ठाऊक होते. त्यामुळे माल घेऊन निघणारा ट्रक किती किलोमीटर प्रवास करणार, त्या मार्गावर कुठे व्यत्यय येऊ शकतो, कुठे रस्त्याचे काम सुरू आहे, ट्रकमध्ये किती टन माल आहे आणि ट्रक किती किलोमीटर प्रति तासाने धावू शकतो, याचा सर्व अभ्यास करून ते माल पोहोचवायचे. वेळेत सेवा मिळत असल्याने मोठय़ा कंपन्यांची मन आणि मर्जी प्यारे खान यांना जिंकता आली. पण, या यशाआधीचा संघर्ष मात्र फारच विदारक होता. प्यारे खान यांची आर्थिक स्थिती बिकट होती. १९९४ ते २००१ अशी सात वर्षे त्यांनी नागपुरात रिक्षा चालवली. वडिलांचे छोटे किराणा दुकान. आई गृहिणी. आटो चालवत असताना प्यारे यांच्या मनात काही वेगळेच सुरू होते. त्यांना मालवाहतूक व्यवसायात रुची होती. मात्र त्यासाठी हवा तेवढा पसा त्यांच्याकडे नव्हता. त्यांनी कर्जासाठी अनेक बँकांचे दरवाजे ठोठावले. मात्र कोणीही दाद देईना. अखेर आयएनजी वैश्य बँकेचे व्यवस्थापक भूषण बस यांनी प्यारे खान यांना २००४ साली ट्रक घेण्यास ११ लाखांचे कर्ज मंजूर केले. आश्मी रोड कॅरिअर प्रायव्हेट लिमिटेड नावाने कंपनी उभारून खान यांच्या व्यवसायाला पारडी नाक्यापासून सुरुवात झाली. एक चालक नेमला आणि ट्रक धावू लागला.

दरम्यानच्या काळात ट्रकचा अपघात झाला. अशात घरच्या मंडळींनी हा व्यवसाय सोडण्याचा सल्ला खान यांना दिला. मात्र त्यांना तो मंजूर नव्हता. खान यांनी कधीही ट्रक उभा ठेवला नाही. ट्रकसाठी घेतलेले बँकेचे हप्ते नियमित फेडत असल्याने काही वर्षांत ट्रक कर्जमुक्त झाला. काम वाढत असल्याचे खान यांनी पुन्हा दोन ट्रक घेण्यासाठी कर्ज घेतले. दरम्यानच्या काळात त्यांचे परिचित असलेले आनंद कुळकर्णी आणि विमल केजरीवाल यांनी खान यांना काही प्रमाणात आर्थिक मदत केली. एकचे दोन आणि दोनचे चार ट्रक झाल्यावर प्यारे खान यांना कधी मागे वळून बघितले नाही. २००७ साली कापसाच्या बियांच्या निर्यातीचे मोठे काम खान यांना मिळाले. अधिक ट्रकची मागणी झाल्याने खान यांनी पुन्हा  कर्ज काढून ट्रक घेतले. संघर्षांच्या काळात ताजबाग येथील झोपडपट्टीत राहणारे खान फ्लॅटमध्ये राहू लागले. व्याप वाढत गेल्याने छोटे कार्यालय सुरू केले. पाहता पाहता खान यांनी तब्बल २५० मोठे ट्रेलर्स खरेदी केले. आश्मी रोडचे नाव मोठय़ा कंपन्यांपर्यंत पोहोचले. त्यामुळे आता खान यांचे ट्रक इतर राज्यांसह देशाबाहेरही धावू लागले. भूतान, बांगलादेश, नेपाळ असे कार्यक्षेत्र विस्तारले. या सर्व व्यवसायात खान यांनी वेळेच्या नियोजनावर सर्वाधिक भर दिला आणि तोच त्यांच्यासाठी फायद्याचा ठरला. खान सांगतात, पूर्वी बँका मला कर्ज देण्यासाठी दारात उभे करीत नव्हत्या. मात्र आता त्याच बँकेचे प्रतिनिधी कोटय़वधींचे कर्ज प्रस्ताव घेऊन येतात. ट्रक व्यवसायाचा व्याप वाढल्याने त्यांना सर्वाधिक गरज होती डिझेलची. त्यामुळे वर्तमानपत्रात आलेली जाहिरात बघून त्यांनी पेट्रोल पंप घेण्याचे ठरविले. मात्र त्यासाठी दहावी उत्तीर्णतेची अट होती आणि खान यांचे शिक्षण दहावी नापास. मग तो पंप मिळवण्यासाठी खान यांनी दहावीची परीक्षा दिली आणि ते उत्तीर्णही झाले. आज त्यांच्याजवळ दोन पेट्रोल पंपही आहेत.

मुलीच्या नावे उभारलेला त्यांचा व्यवसाय मध्य भारतात सर्वात मोठा व्यवसाय ठरला. खान यांचे बहुमजली कार्यालय दिघोरी चौकात असून आलिशान कार्यालयाचे बांधकाम विहिरगांवजवळ सुरू आहे. आज चारशेहून अधिक कर्मचारी त्यांच्या कार्यालयात काम करत असून चारशे कोटींची उलाढाल आहे. गत आर्थिक वर्षांत खान यांनी जवळपास साडे पाच कोटींचा कर भरणा केला आहे. खान यांची यशोगाथा पाहता त्यांना शंभरहून अधिक विविध पुरस्कारही मिळाले आहेत. विदर्भात १६० चाकांचा सर्वात मोठा ट्रेलर खान यांच्याकडे आहे. देशात दिल्ली, जालंधर, कोलकाता, चेन्नई, मुंबई अशी त्यांच्या कंपनीची १५ कार्यालये आहेत. सध्या जेएसडब्ल्यू स्टीलचे दोन वर्षांसाठी पाचशे कोटींचे काम त्यांच्या हाती आहे. टाटा स्टीलचेही दोनशे कोटींचे काम मिळाले असून केएसई, रिलायन्स, एल अ‍ॅण्ड टी, सेल आदी मोठय़ा कंपन्यांचे भरपूर काम सुरू आहे. २०२२ पर्यंत एक हजार कोटींपर्यंत उलाढाल नेण्याचे ध्येयही अवघड नाही. सध्या शंभर कोटी इतकी सर्व ट्रेलर्सची किंमत असून अजून ५० नव्या ट्रेलर्ससाठी त्यांनी नोंदणी केली आहे. त्यासाठी ८० कोटींचे कर्ज घेतले आहे. खान सांगतात, व्यवसाय पारदर्शक व सचोटीचा असल्याने माझ्यावर कोणाचेच दडपण नाही. कंपनी वस्तू व सेवा कर प्रामाणिकपणे भरते. खान दररोज दहा तास काम करतात. चारशेहून अधिक मोबाइल कॉल घेतात. ऑटो चालवत असताना खान यांच्या घरची आर्थिक बाजू अधिक मजबूत करण्यासाठी ओ.पी. सिंग यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये ते अर्धवेळ पियानो वाजवायचे. दिवसा ऑटो आणि रात्री ऑर्केस्ट्रामध्ये कामातून जमवलेल्या पैशातून त्यांनी पहिल्या ट्रकसाठी लागणारे भांडवल उभे केले होते.

सामाजिक बांधिलकीची जपणूक

खान यांच्या कार्यालयात आज चारशेहून अधिक कर्मचारी आहेत. यापैकी काही कर्मचाऱ्यांसाठी खान यांनी घरे बांधून देण्याचे वचन दिले होते. ते आता पूर्णत्वास येत आहे. त्यासाठी बुटीबोरी येथे ३५ एकर जागा घेतली असून तेथे निवासी संकुल बांधण्याचे काम सुरू आहे. त्याशिवाय कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी शाळा देखील उभारण्यात येणार असून त्यांना शिक्षण मोफत देण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने नियमित तपासणीसाठी रुग्णालये देखील तयार करण्याचा त्यांचा मानस आहे.

आता गुंतवणूक जलवाहतुकीत

अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटने खान यांच्या कामाची दखल घेत त्यांना पुरस्कृत केले आहे. आजवर त्यांना मिळालेला हा सर्वात मोठा पुरस्कार असल्याचे ते सांगतात. अलीकडेच बँकॉक येथे ‘एशिया वन’तर्फे झालेल्या भारतातील यशस्वी उद्योजकांच्या सत्कारात प्यारे खान यांचा समावेश होता. भविष्यात अधिक काम करण्याची इच्छा असून पुढील पाऊल म्हणून खान यांनी नौकावहन क्षेत्रात उतरण्याची तयारी दर्शविली आहे. यामध्ये ते पाच हजार टन माल वाहू शकणारे छोटे जहाज घेणार असून त्यासाठी २५ कोटींच्या गुंतवणुकीची त्यांनी तयारी केली आहे.

शफी पठाण

प्यारे खान (अश्मी रोड कॅरिअर प्रा.लि.)

* व्यवसाय : मालवाहतूक

* मूळ गुंतवणूक  :        ११ लाख रु.

* स्व-भांडवल :            १२ हजार रु.

* सरकारी योजनेचा फायदा? :  नाही

* सध्याची उलाढाल : ४०० कोटी रु.

* रोजगार निर्मिती : ६०० कर्मचारी

* शिक्षण : १२ वी उत्तीर्ण

* लेखक ‘लोकसत्ता’चे नागपूर प्रतिनिधी rushikesh.mule@expressindia.com

आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस, सूचना ई-मेल :  arthmanas@expressindia.com वर कळविता येईल.