अमेरिकेच्या हेरगिरीचा चेहरा जगासमोर मांडून खळबळ उडवून देणाऱ्या एडवर्ड स्नोडेनने ही जागल्याची भूमिका पार पाडण्याचे धाडस कसे केले, हे ‘स्नोडेन’ हा चित्रपट वा ‘सिटिझनफोर’ सारखा माहितीपट असो, की ‘द गार्डियन’चा पत्रकार ल्युक हार्डिगचे ‘द स्नोडेन फाइल्स’ हे पुस्तक असो, त्यातून समोर आले आहेच. अमेरिकेसारखी महासत्ता तिच्या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेमार्फत जगावर पाळत ठेवण्याचे मनसुबे कशी आखत होती, याचे धडधडीत पुरावे स्नोडेनने २०१२ साली जगासमोर मांडले आणि अखेर अमेरिकेला ‘तो’ प्रकल्पच माघारी घ्यावा लागला. आता अमेरिका एकीकडे, ‘तो काही आमचा गुप्तहेर नव्हताच मुळी, तो तर आमच्याकडील एक कनिष्ठ दर्जाचा हॅकरच होता’ असा दावा करत स्नोडेन सांगत असलेल्या ‘आतल्या गोटा’तील माहितीची अधिमान्यताच काढून टाकू इच्छिते; आणि दुसरीकडे स्नोडेनला ताब्यात घेऊन त्याला हेरगिरी कायद्याच्या उल्लंघनासाठी जन्मठेपेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. (स्नोडेनचीच सहप्रवासी असलेली चेल्सी मॅनिंग हिला तशी ३५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा अमेरिकेने दोन वर्षांपूर्वी दिलेली आहेच).

परंतु २०२० सालापर्यंत रशियाने स्नोडेनला आश्रय दिला असल्याने सध्या तो मॉस्कोत राहतोय, आणि तिथूनच त्याने आठवडाभरापूर्वी केलेल्या एका ट्वीटमधून आपल्या आत्मचरित्राची घोषणा केली आहे. पुढील महिन्यात, १७ सप्टेंबरला प्रसिद्ध होणाऱ्या त्या पुस्तकाचे शीर्षक असणार आहे- ‘पर्मनंट रेकॉर्ड’! ‘मॅकमिलन’ या प्रकाशन संस्थेतर्फे ते २० हून अधिक देशांत प्रकाशित केले जाणार असून त्यात स्नोडेन त्याच्या देशाच्या- अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेसोबत त्याने घालवलेल्या काळाविषयी, जगावर- म्हणजे जगातल्या प्रत्येकावर पाळत ठेवण्याची जगड्व्याळ यंत्रणा उभारण्याच्या त्या प्रकल्पातील त्याचे अनुभव, तिथे झालेला वाद आणि मग अमेरिकेच्या मनसुब्यांना जगासमोर आणण्याच्या निर्णयापर्यंत तो कसा पोहोचला, हे जाणून घेता येणार आहे!