आजची तरुणाई काय करते, हा दर आदल्या पिढीचा चिंतेचा आणि स्वाभाविक काळजीचा विषय असला तरी कुण्या एका काळापासून सुरू असलेली ही पालकीय विचारांची परंपरा खंडित होणाऱ्या कालप्रवाहात आजचा पाल्य जगत आहे. म्हणजे बेफिकिरी, बंडखोरी शेकडो वर्षे तरुणाईचा गुणधर्म होता; त्यात बदल झाला नाहीच. पण शेकडो वर्षे तरुणाई ज्या पारंपरिक जीवन आवर्तनातून जात होती, ज्या सामाजिक संस्थांशी कटिबद्ध राहिल्यामुळे ‘पाल्य-पालक’ या भूमिकांमध्ये अटळपणे शिरत होती, तो भवतालच आज उद्ध्वस्त होत चालला आहे. नुसत्या भारतापुरता विचार करायचा झाला तर सिनेसंगीताने आकृष्ट झालेली साठोत्तरीतील बंडखोर तरुणांची पिढी पालक आसनावर जाऊन बसली तेव्हा ऐंशीच्या दशकात ड्रग-डिस्को आणि व्हिडीओत रमलेल्या नव्या पिढीच्या नीतिमूल्यांची लक्तरे काढू लागली. ऐंशीमधील ऐशारामीचे ‘वाल्या’पण अनुभवून नव्वदोत्तर काळात ‘वाल्मीकी’ बनलेली माता-पित्यांची जमात दोन हजारोत्तर काळातील ‘स्मार्ट-फास्ट’ भवतालात निपजलेल्या पिढीशी विचार-आचार-मूल्य-नीतिमत्ता आणि शिकवणीपासून कोसो मैल लांब फेकली गेली. कुण्या एके काळी एमटीव्ही-व्ही चॅनल्सवरची गाणी पाहण्यात, चोवीस तास कानावर हेडफोनचे दोरे लटकावून वॉकमन ऐकण्यात, मित्रांच्या टोळक्यांसोबत धाडसांच्या फैरी झाडण्यात आणि मद्य-मौजेच्या चरक्यात चक्रावलेले गेल्या पिढीतील तरुण आज पालकांच्या भूमिकेतून काय पाहतायत?

आभासी समाजमाध्यमांत जगाशी एकरूप होऊनही कुटुंबाशी संवाद साधण्यात असमर्थ ठरलेली, ज्ञान-माहिती- डाटा- व्हिडीओगेम-पोर्नस्फोटाच्या वणव्यात पोळली गेलेली, फास्टफूूड- जंकफूड- सॉफ्टड्रिंक्स- सॉफ्टड्रग्जच्या आहारी गेलेली, स्पर्धा-आडमार्ग यांच्या तडाख्यात सापडलेली आणि राजकीय- सामाजिक विकृतीच्या लाटेवर आरूढ झालेली आजची पिढी समूहातही अधिकाधिक एकटी बनत चालली आहे. या एकटेपणाची मानसिक आंदोलने शालेय विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या हत्या, बलात्कार, व्यसने, आत्महत्यांमध्ये परावर्तित होत आहेत आणि ‘आपला पाल्य असा नाहीच मुळी’च्या तालावर नाचणारे बहुतांश सुखभ्रमित पालक कुटुंब-विवाह आणि सर्वच संस्थांशी फटकून वागण्याने अचंबित झाले आहेत. हे आजचे देशवास्तव जगाच्या पातळीवर पाहायला गेलो तर अधिक उग्र स्वरूपात पाहायला मिळेल आणि त्याची स्पंदने ताज्या साहित्य-सिनेमा इतकेच नाही तर टीव्ही मालिकांमध्येही उमटल्याचे लक्षात येईल.

गेल्या महिन्यात ‘नेटफ्लिक्स’वरच्या ‘द एंड ऑफ द फकिंग वर्ल्ड’ नावाच्या ट्रॅजिकॉमेडी टीव्ही मालिकेने जगभरात खळबळ उडवून दिली. ही ब्रिटिश मालिका अमेरिकी लेखक चार्ल्स फोर्समन याच्या ग्राफिक नॉव्हेल म्हणजेच चित्रकादंबरीवर आधारित आहे. ‘द एंड ऑफ द फकिंग वर्ल्ड’मध्ये फोर्समनने चितारलेली धुसफुसती तरुणाई ही लेखाच्या सुरुवातीलाच विशद करण्यात आलेल्या तुटलेल्या जगाशी संलग्न आहे. २०११ पासून कॉमिक्समध्ये क्रमश: प्रसिद्ध होणारी आणि २०१३ साली ग्रंथबद्ध झालेली ‘द एंड ऑफ द फकिंग वर्ल्ड’ टीव्ही मालिकेच्या योग्य माध्यमांतरातून आता नव्याने प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली असून गतवर्षांखेर चित्रकादंबरीची ताजी अत्याकर्षक आवृत्ती बाजारामध्ये दाखल झाली आहे.

युवा पिढीचे दाहक मनोभान रेषांमधून पकडणाऱ्या चार्ल्स फोर्समन याची प्रत्येक चित्रचौकट अचूक निवेदनासह आजच्या उग्र भवतालाला कवेत घेताना दिसते. निरागसतेशी घटस्फोट घेतलेल्या व्यक्तिरेखांमधून या कादंबरीला सुरुवात होते. सतराव्या वर्षांत असलेला इथला जेम्स पहिल्या पाचेक चौकटींतच नवव्या वर्षांपासूनचे आत्मचरित्र उलगडतो. नवव्या वर्षांत विनोदबुद्धीचा आपल्यात अंशच नाही ही जाणीव झालेला जेम्स शेजाऱ्यांचे प्राणी-पक्षी गुप्तपणे मारून टाकण्यात पारंगत बनला. त्याचे मन आणि शरीर जखमा आणि हत्यातुर बनले. पंधराव्या वर्षी आपल्या संवेदनेची परीक्षा म्हणून बोटे मोडून एका हातामध्ये त्याने व्यंग तयार केले. सार्वकालिक धोक्याच्या सोळाव्या वर्षी त्याने आपल्या हायस्कूलमधील समवयस्क अलिसा या मुलीला आपले तिच्यावर प्रेम असल्याचे भासवले आणि त्या आभासी प्रेमाचा मोबदला म्हणून आपल्यावर वर्चस्व गाजविणाऱ्या अलिसासोबत घरातून पोबारा करण्याचा कार्यक्रम आखला.

आईविना वाढलेल्या पोरक्या जेम्सची खुशालचेंडू वडिलांच्या वर्तणुकीने जितकी मानसिक वाताहत झाली आहे, त्याहून अधिक अलिसाची भरल्या घरामध्ये कुतरओढ झाली आहे. त्यामुळे जगावर करवदणारी अलिसा अल्पकाळात लैंगिक ज्ञान प्राप्त करून जेम्सची त्याबाबत शिकवणी घेते. जेम्सला आपल्या वडिलांना ठोसा लगावण्याची इच्छा पूर्ण करण्यास उद्युक्त करते. या दोघांची विजोडोत्तम जोडी एकमेकांचा दुस्वास करीत दिशाहीन प्रवासासाठी निघते. या दरम्यान जेम्स अलिसाचा खून करण्याच्या विचारांना थोपवत तिच्या विचित्र वागण्याशी एकरूप होतो. ती दोघे एका बंद घरात आश्रय घेतात. त्या घराच्या प्रकट होणाऱ्या मालकाकडून अलिसावर होणाऱ्या अतिप्रसंगाला वाचविण्यासाठी जेम्सच्या हातून त्याची हत्या घडते. त्याचे सारे पुरावे पुसून टाकत ते दोघे दूरच्या शहरात राहणाऱ्या अलिसाच्या वडिलांकडे प्रयाण करतात. वाटेत एका दुकानामध्ये दरोडा टाकतात. मागे राखलेल्या पुराव्यांमुळे पोलीस त्यांच्या मागावर लागतात आणि त्यांचा प्रवास अवघड करून टाकतात.

‘द एंड ऑफ द फकिंग वर्ल्ड’मधील भाषा कशी असेल, याची या चित्रकादंबरीच्या शीर्षकातूनच कल्पना येऊ शकते. सहानुभूतीशून्य असल्या तरी या चित्रकादंबरीमधील व्यक्तिरेखा प्रचंड आवडण्यासारख्या आहेत. (टीव्ही मालिकेमुळे त्या सध्या स्टारपद अनुभवत आहेत.) त्या अतिव्यक्तिवादी किंवा अतिअप्पलपोटी आहेत. त्या सुखमृगजळाच्या पाठी धावणाऱ्या गेल्या पिढीचे गुणधर्म बाळगत नाहीत. त्यांच्यात निरागसता नाही. त्यांच्यात एकमेकांविषयी काळजी आहे, ती देखील तोंडदेखली आणि स्वहितासाठी. उगाच आधुनिक जगाचे रोमियो-ज्युलिअट वगैरे बनण्याची त्यांची इच्छा नाही. टीव्ही मालिकेत तर यातील अलिसा सर्वाधिक व्यक्तिवादी आणि प्रॅक्टिकल विचारसरणीची दाखविली आहे. एकमेकांना टाळून गुन्ह्य़ाची जबाबदारी जेम्सवर ढकलून नामानिराळे राहण्याचा विचारही ती करताना दिसते. वास्तव जगात पारंपरिक प्रेमकथांच्या विरोधी स्वप्रेमाकडे वाढत चाललेला कल हे या संपूर्ण चित्रकथेचे सार आहे.

फोर्समनची ही चित्रकथा आली त्या वर्षी तिची दखल ग्राफिक नॉव्हेल वर्तुळामध्ये आदराने घेतली गेली. तिच्यावर हातघाईत तयार केलेला एक सिनेमाही आला. पण चित्रकादंबरीवर जगाचे लक्ष गेले ते केवळ ब्रिटिश टीव्ही मालिकेमुळे. ती मालिका गाजली, तेव्हा फोर्समनच्या इतर कामाकडे वाचकांचा ओढा वाढला. ‘द एंड ऑफ द फकिंग वर्ल्ड’ या चित्रकादंबरीचाच पुढला भाग ‘सेलिब्रेटेड समर’ या नावाने आला आहे. ७० पानांची ही कथाहीन चित्रकादंबरी आधीच्या कादंबरीपेक्षा आकाराने लहान, पण विचारांनी समान आहे. यात माईक आणि वुल्फ हे हायस्कूल संपवून तारुण्याच्या निश्चित टोकावर आपल्या अभावग्रस्ततेतून मुक्त होण्यासाठी झगडताना दाखविले आहेत. कादंबरीच्या पहिल्या दोन पानांतील चौकटीतच त्यांचा ड्रग्जच्या अमलाखाली प्रवासाचा कार्यक्रम ठरतो. दोघांनाही समुद्रकिनाऱ्यावर जायचे आहे; मात्र तो नेमका कुठे आहे, याची त्यांना प्रवासात कल्पना नसते. या छोटुकल्या प्रवासात ते समुद्रकिनारा शोधून काढतात आणि आपल्या जगण्यातील एकटेपणाच्या आजाराची परिस्थिती उलगडतात. आई-वडिलांचे छत्र हरविलेला आणि आजीच्या पंखांखाली राहणाऱ्या वुल्फचे भीषण जगणे तो या प्रवासात माईकला सांगतो, तसेच माईक आपल्या प्रेयसीला सोडून देण्याच्या उदात्त कल्पनांचे स्पष्टीकरण वुल्फला देतो. प्रवासात त्यांच्यासोबत दुर्घटना घडत नाही किंवा नाटय़पूर्ण वा धाडसपूर्ण गोष्टी समोर येत नाहीत. साऱ्या प्रवासात वुल्फ लघवी करण्याचे विसरून गेल्याच्या जाणिवेने अस्वस्थ होतो आणि माईक त्याच्या वेगळ्याच स्वप्नभंगांनी बिथरलेला राहतो.

अनेक जण ‘द एण्ड ऑफ द फकिंग वर्ल्ड’मधील मुख्य व्यक्तिरेखांची तुलना साठोत्तर दशकातील ‘बोनी अ‍ॅण्ड क्लाइड’शी करू पाहतील. पण ते तसे नाहीत. बरेच वाचक ‘सेलिब्रेटेड समर’ची तुलना हण्टर थॉम्पसन या तिरपागडय़ा पत्रकाराने लिहिलेल्या ‘फिअर अ‍ॅण्ड लोथिंग इन लास वेगास’ या ड्रगपर्यटन लेखनाशी करू धजतील. पण त्यातील व्यक्तिरेखाही तशा नाहीत. आजची पिढी जगण्याकडे आणि मूल्य-नीतिमत्तांची थोतांड शिकवणी घेणाऱ्या आदल्या पिढीच्या कृतक वृत्तीशी फटकून वागण्यात समाधान कशी मानते, याकडे साहित्य-सिनेमा आणि टीव्ही मालिका गांभीर्याने लक्ष वेधत आहेत. जे अ‍ॅशर या लेखकाच्या ‘१३ रिझन्स व्हाय’ या हायस्कूलमधील रॅगिंगचा वास्तव भयप्रकार उलगडणाऱ्या कादंबरीवर बेतलेल्या मालिकेने गेले वर्ष ढवळून काढले होते. या वर्षी तो मान फोर्समनच्या चित्रकादंबऱ्यांनी पटकावला आहे.

आजची तरुणाई काय करते, हे जाणून घेणारी आजची पालकपिढी ही शेवटची आहे. त्यांच्यासाठी पालकनीती ठरविण्यासाठी किंवा पाल्याला समजून घेण्यासाठी नाही, तर भवतालातील तरुणाईच्या एकल फौजेचे प्रतिबिंब कसे दिसते, याची जाणीव करून घेण्यासाठी या चित्रकादंबऱ्या महत्त्वाच्या आहेत. आपण फार भावुक आणि हळव्या-निरागस जगात वावरतो, अशी भ्रामक समजूत असलेल्यांना या कादंबऱ्यांच्या वाटेला जाऊन काहीच हाती लागणार नाही, हेही खरेच!

१) ‘द एंड ऑफ द फकिंग वर्ल्ड’

पृष्ठे : १३६, किंमत : ११६० रुपये

२) ‘सेलिब्रेटेड समर’

पृष्ठे : ७०, किंमत : १०६० रुपये

लेखक : चार्ल्स फोर्समन

प्रकाशक : फॅन्टॅग्राफिक्स

 

पंकज भोसले

pankaj.bhosale@expressindia.com