छत्रपती संभाजीनगर : शेतकरी कर्जमाफी, पीक आधारभूत किमतीच्या (एमएसपी) भावावर २० टक्के हमी भाव याबाबत सरकार निर्णय घेण्यास विलंब करत आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांच्या कुटुंबावर आर्थिक परिणाम होत आहेत. राज्य सरकारला शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी २८ ऑक्टोबर रोजी शेतकरी, शेतमजूर हक्क संघर्ष समिती मुंबईत लाखोंच्या संख्येने जाऊन ठिय्या आंदोलन करेल, अशी माहिती प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.
शेतकरी कर्जमाफी व विविध प्रश्नांवर राज्यव्यापी आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी शेतकरी संघटनांच्या संघर्ष समितीची राज्यात स्थापना झाली आहे. त्याची दुसरी विभागीय बैठक आज छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली. यावेळी आमदार बच्चू कडू, विजय जावंधिया, महादेव जानकर, डॉ. अजित नवले, आमदार कैलास पाटील, अनिल घनवट, प्रकाश पोहरे, विठ्ठलराजे पवार, प्रशांत डिक्कर, विजय कुंभार, काशिनाथ जाधव व अन्य शेतकरी संघटना, नेते उपस्थित होते. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
‘राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत. सरकार दरवेळी या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आश्वासन देते. त्याची पूर्तता मात्र करत नाही. राज्यात अतिवृष्टी झाली. अनेक ठिकाणी पंचनामे झाले नाहीत. सत्ताधारी आमदारांच्या सांगण्यावरून काही ठिकाणी निवडक पंचनामे होत असल्याच्या तक्रारी आहेत. हे गंभीर आहे. नैसर्गिक आपत्तीवर दाद मागण्यासाठी कुठे दाद मागावी असा प्रश्न आहे, असे बच्चू कडू म्हणाले.
शेतकरी कर्जमाफीबद्दल ठोस निर्णय घेतला गेला नाही. शेजमजुरांचे प्रश्न अनुत्तरित आहेत. या सर्व प्रश्नांची सोडवणूक व्हावी आणि प्रश्न सुटेपर्यंत आम्ही २८ ऑक्टोबरला मुंबईत राज्यव्यापी ठिय्या आंदोलन करणार आहोत. राज्यभर जनजागृती करण्यासाठी संघर्ष समितीचे पदाधिकारी बैठका घेतील. महादेव जानकर म्हणाले, की शेतकऱ्यांना न्याय मिळावा, ही आमची भूमिका आहे. ही चळवळ महाराष्ट्रभर राबविण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. विजय जावंधिया म्हणाले की सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांना जगाच्या बाजारपेठेत यंदा तग धरता येईल की नाही अशी परिस्थिती आहे. एमएसपी व २० टक्के हमी भाव मिळावा, शेतजमजुरीत वाढ व्हावी यासह अन्य मागण्या आम्ही सरकारसमोर मांडणार आहोत.