औरंगाबाद  : शिवाजीनगर रेल्वे फाटकाजवळ होणारी दररोजची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या ठिकाणी एक भुयारी मार्ग तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून त्यासाठी कराव्या लागणाऱ्या भूसंपादनासाठी ६ कोटींची गरज असल्याचे सांगत रक्कम देण्याची मागणी महानगरपालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नोंदवली आहे.

यासंदर्भातील निधी मिळताच रेल्वेगेट ते देवळाई चौक दरम्यान दोन्ही बाजूंनी १ हजार ८०० चौरस मीटर भूसंपादनाची प्रक्रिया राबवली जाईल, असे नगररचना विभागाचे उपअभियंता संजय चामले यांनी सांगितले. शिवाजीनगर येथील रेल्वे फाटकावर दररोजच वाहतुकीची कोंडी होण्याचे चित्र असते. त्याचा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. बीड वळण रस्त्यावरून सातारा-देवळाई, गांधेली, बाळापूर भागातील नागरिकांना शिवाजीनगर रेल्वेफाटक ओलांडूनच शहरात प्रवेश करावा लागतो. मात्र औरंगाबादेत येणाऱ्या आणि येथून जाणाऱ्या रेल्वेच्या वेळी वारंवार फाटक बंद करावे लागते. या दरम्यान, रेल्वे फाटक परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. परिणामी शिवाजीनगर रेल्वे फाटकाजवळ पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती. खंडपीठाने तातडीने निधी उपलब्ध करून देऊन पर्यायी व्यवस्था करून देण्याची सूचना केली. त्यानुसार राज्य सरकारने रेल्वे, सार्वजनिक बांधकाम आणि महापालिका यांची संयुक्त समिती स्थापन केली. या समितीने भुयारी मार्गाचा आराखडा व नकाशा तयार करून प्रत्यक्ष स्थळपाहणी केली.

महापालिकेवर भूसंपादनाची जबाबदारी रेल्वेच्या भुयारी मार्गासाठी भूसंपादन करावे लागणार आहे. रेल्वेफाटक ते  बीडवळण रस्ता मार्गावरील देवळाई चौकापर्यंत दोन्ही बाजूनी मिळून १८०० चौरस मीटर जमिनीचे संपादन करण्यासाठी महापालिकेने ६ कोटी ४ लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंत्यांकडे सादर करण्यात आला आहे.  हा निधी प्राप्त होताच भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात येईल.

साडेतीन मीटर खोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवाजीनगर रेल्वे फाटकाजवळील भुयारी मार्ग साडेतीन मीटर खोल (म्हणजे १२ फुट) व साडेपाच मीटर रुंद भुयारी मार्गाची कमान असणार आहे. शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी चौकातून भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे. दोन्ही बाजूंनी साडेपाच मीटर रुंदीचा हा मार्ग असणार आहे. रेल्वेफाटकावरच भुयारी मार्गाची कमान केली जाणार असून दोन्ही बाजूनी उतार करावा लागणार आहे. बीड वळण रस्त्यावरील पर्यारी मार्गाला भुयारी मार्ग जोडला जाणार असल्याची माहिती देण्यात आली.